वाकीफ कहां जमाना हमारी उडान से.. वो और थे जो हार गए आसमान से.. या पद्धतीने आपण काम करत आहात यशस्वी व्हा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे आयोजित जयंती उत्सवात भुजबळ बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आदी उपस्थित होते. दरम्यान, मंत्रिमंडळात डावलले गेल्याने भुजबळ नाराज आहेत. त्यामुळे भुजबळ काय बोलतील याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष होतं. भुजबळांनी मात्र आपल्या भाषणात सरकारची पाठ थोपटली.
भुजबळ पुढे म्हणाले, राज्यातील युवकांच्या सबलीकरणासाठी महाज्योतीला साडेचारशे कोटींचा निधी दिला. पुण्यातील भिडे वाड्याचं काम आपण मार्गी लावलं. त्यावेळीही मी विरोधी पक्षातच होतो. नंतर चंद्रकांत पाटील यांनीही त्यात लक्ष घातलं. कोर्टातूनही न्याय मिळाला. यानंतर आता काम मार्गी लागलं आहे.
सिडनीमध्येही टीम इंडियाची दाणादाण, अवघ्या 185 धावांत गारद
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी सुरू करण्यासाठी दोनशे कोटींची तरतूद आहे. यासाठी साधारण दहा एकर जमिनीची आवश्यकता आहे. आता यासाठी जर ताबडतोब जागा दिली तर हे काम सुद्धा मार्गी लागेल यात शंका नाही. मुली सुद्धा एनडीएत शिक्षण घेऊन प्रशिक्षित होऊन बाहेर पडतील असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने आधी पुरस्कार दिला जात होता. तो आता बंद आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की आता तुम्ही बंद पडलेले पुरस्कार याच दिवशी म्हणजे 3 जानेवारीला दिले जातील अशी ऑर्डर काढा. येथे सगळे साताऱ्याचे मंत्रीही आहेत. मला खात्री आहे तुमच्या नेतृत्वात काम नक्की होईल, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.