मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांचे अपहरण आणि हत्या व खंडणी प्रकरणाच्या तपासाला गती आली आहे. गुरुवारी सकाळीच आयपीएस अधिकारी बसवराज तेली (Basavraj Teli) यांच्या नेतृत्वातील एसआयटीचे पथक चौकशीसाठी केजमध्ये दाखल झाले आहे. सोबतच बीडमध्येही (Beed) वाल्मीक कराडची (Valmik Karad) सीआयडीने एका खोलीत दिवसभर चौकशी करत त्याचे तोंड उघडण्याचा प्रयत्न केला. याशिवाय हत्या प्रकरणातील सुदर्शन घुलेसह तीनही फरार आरोपींना वाँटेड म्हणून घोषित केले. माहिती देणाऱ्यांना बक्षीसही दिले जाणार आहे. (Three people including Sudarshan Ghule declared wanted. What happened in Beed throughout the day on Thursday)
Valmik Karad नेमकं आतापर्यंत काय काय घडलं आहे या प्रकरणात पाहुया…
संतोष देशमुख अपहरण व हत्या प्रकरणासह खंडणी, मारहाण आणि अॅट्रॉसिटी या चारही गुन्ह्यांचा तपास सीआयडी करीत आहे. यातही हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्रपणे सीआयडीमधील उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाने सकाळीच केजमध्ये येत संबंधित अधिकाऱ्यांची विश्रामगृहावर चौकशी केली. तसेच त्यांनी दिवसभरात फरार आरोपींच्या नातेवाईकांचीही चौकशी केल्याची माहिती आहे. बसवराज तेली हे सायंकाळी साडे सहा वाजता केज विश्रामगृहाबाहेर पडले. तेली निघून गेल्यानंतर विश्रामगृहातून दोन पुरुष व पाच महिला, दोन लहान मुले हे सर्व आरोपींचे नातेवाईक होते.
तर तिकडे सीआयडीचे इतर अधिकारी खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मीक कराडची कसून चौकशी करीत आहेत. गुरुवारी सकाळीच नाश्ता झाल्यावर कराड याला बीड शहर पोलिस ठाण्यातील एका खोलीत घेऊन बंद दाराआड चौकशी करण्यात आली. कराड हा बीड शहर ठाण्याच्या कोठडीत असल्याने या परिसरात आणि कोठडीबाहेर सुरक्षाही तैनात करण्यात आली आहे. ठाण्यात ये-जा करणाऱ्यांची नोंद घेतली जाते. सुरक्षेसाठी एरव्ही तीन कर्मचारी आणि एक पर्यवेक्षण अंमलदार असायचा. परंतु, आता सहा कर्मचारी आणि पर्यवेक्षण अंमलदार असणार आहेत.
सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आता मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत होणार; मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी
या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक पोलिस उपनिरीक्षक असेल. तसेच पोलिस निरीक्षक हे प्रत्येक तीन तासाला भेट देणार आहेत. याशिवाय पलंगाबद्दल गैरसमज पसरला जात आहे. कोठडीचा बंदोबस्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मागणी केल्याने हे मुख्यालयातून देण्यात आले. एक पलंग हा महिला कर्मचाऱ्यांना दिला होता. अफवा पसरवून पोलिसांची प्रत करू नये, असे आवाहन बीडचे अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हे पलंग पोलिसांसाठी असल्याचे सांगितले. प्रसिद्धीसाठी उगाच काहीही बातम्या देऊ नका असे म्हणत त्यांनी माध्यमांनाही झापल्याचे बोलले जाते.
वाल्मिक कराडला मिळणाऱ्या कथित व्हिआयपी ट्रिटमेंटवरही अनेक कथा रचल्या जात आहेत. पण त्याला भात, वरण, पोळी, भाजी असे सरकारी जेवण दिले जात आहे. परंतु, यातील केवळ भात आणि वरणच कराड हा खात आहे. पहिल्या दिवशीही त्याने भातावरच दिवस काढला होता. असेही पोलिसांनी सांगितले. कराड याला बीपी अन् शुगरचा त्रास आहे. पहिल्या दिवशी शासकीय डॉक्टरांनी तपासून औषधोपचार केले. त्यानंतर त्याला आता कोठडीतच गोळ्या पुरविल्या जात आहेत. गुरुवारी त्याची वैद्यकीय तपासणी झाली नाही. प्र. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय राऊत यांनीही याला दुजोरा दिला.
तिसऱ्या बाजूला खुनासह खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेले सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे यांना वाँटेड म्हणून घोषित केले आहे. बीड पोलिसांनी या आरोपींची माहिती देणाऱ्यास बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. तसेच नाव गोपनीय ठेवण्याचा विश्वासही पोलिसांनी दिला आहे.
एका बाजूला या सळ्या घडामोडी घडत असताना पोलीस स्टेशनच्या बाहेरही या हत्या प्रकरणात हालचाली होत आहेत. सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. एक पोलिस कर्मचारी त्यांच्या संरक्षणासाठी दिले आहेत. बाहेरगावी जाताना ते सोबत असतात. गुरुवारी धनंजय देशमुख यांनी एसआयटी आणि सीआयडीच्या पथकाची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना भेट मिळू शकलेली नाही. मी केजला शासकीय विश्रामगृह येथे एसआयटी पथक येणार असल्याने गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गेलो होतो. परंतु, तोपर्यंत अधिकारी आले नव्हते, म्हणून मी परत मस्साजोगला आलो, असे धनंजय देशमुख यांनी सांगितले.