कोरोनाचं संकट जगावर लादणाऱ्या चीनमधून (China New Virus) पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चीनमध्ये आणखी एक महामारी पसरल्याचा दावा सोशल मिडियातून केला जात आहे. यामध्ये इन्फ्लूएंजा ए, एचएमपीवी, मायकोप्लाज्मा न्यूमोनिया आणि कोविड 19 चे संक्रमण वेगाने फैलावत असल्याचा दावा केला जात आहे. या दाव्यांनुसार हॉस्पिटल्स फुल्ल झाली आहेत. त्यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. इतकेच नाही तर या संकटाला तोंड देण्यासाठी चीन सरकारने आरोग्य आणीबाणीची घोषणा केल्याचीही माहिती मिळाली आहे. परंतु, या दाव्यांचे कोणतेही ठोस पुरावे अजून तरी मिळालेले नाहीत. चीनचे आरोग्य अधिकारी तसेच जागतिक आरोग्य संघटनेनेही याबाबत खात्री केलेली नाही.
सोशल मीडियावर काही युजर्सने हॉस्पिटल्समधील प्रचंड गर्दीचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हायरस वेगाने फैलावत असल्याचा दावाही केला आहे. एका युजरने तर चीनमध्ये आणीबाणी घोषित केल्याचाही दावा केला आहे. काही लोकांनी याचा संबंध थेट 2020 मधील कोरोनाशी जोडून हा नवा व्हायरसही अत्यंत घातक असल्याचा दावा केला आहे. परंतु, सोशल मिडियावर शेअर होत असलेला व्हिडिओ आणि यातील सत्यता याची कोणतीही ठोस माहिती अजून तरी समोर आलेली नाही.
याच दरम्यान सोशल मीडियावर असाही दावा केला जात आहे की चीनने कोणतीच आणीबाणी घोषित केलेली नाही. दवाखान्यातही अशी गर्दी नाही जी मिडियातून दखवली जात आहे. चीनी आरोग्य अधिकाऱ्यांनीही असे दावे फेटाळून लावले आहेत. त्यामुळे या प्रकाराची अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
जागतिक आरोग्य संघटनेने चार दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते की चीनने कोविड 19 विषाणूच्या उत्पत्तीबाबत माहिती द्यावी असे आवाहन चीनला केले आहे. वैज्ञानिक आणि नैतिक दृष्टीकोनातूनही हे अत्यंत आवश्यक आहे. पारदर्शकतेचा अभाव आणि जागतिक पातळीवर सहकार्याची भावना नसेल तर भविष्यातील आजारांना रोखणे अशक्य होईल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.