मुकेश अंबानीच्या संपत्तीत सातत्याने वाढ होत असताना आता एका मोठ्या व्यवहारात, 5,286 एकर पेक्षा जास्त पसरलेली महाराष्ट्रातील सर्वात मोठी औद्योगिक जमीन, मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ला फक्त 2,200 कोटी रुपयांना विकली गेली आहे. ही औद्योगिक जमीन नवी मुंबई विमानतळ, JNPT आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाजवळ स्थित आहे. या व्यहाराबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. या व्यवहारानंतर अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड आपलं भांडवल कमी करण्याच्या तयारीत आहे. या जमिनीच्या खऱ्या किमतीबद्दल आता प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. कारण या जमिनीजवळ मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि नवी मुंबई विमानतळ यांच्यासारखे मोठे पायाभूत प्रकल्प आहेत. त्यामुळे या जमिनीची किंमत बरीच जास्त असायला हवी होती.
डिसेंबर 2024 मध्ये हा व्यवहार झाला. या जमिनीची मालकी आधी नवी मुंबई IIA प्रायव्हेड लिमिटेडकडे होती. नवी मुंबई सेझ नावानं हा परिसर ओळखला जायचा. रिलायन्सनं NMIIA मध्ये 74 टक्के भागिदारी खरेदी केली आहे. या व्यवहारात आनंद जैन यांची कंपनी जय कॉर्प लिमिटेडचाही सहभाग आहे. जय कॉर्पची सहायक कंपनी असलेल्या अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेडजवळ NMIIA ची मालक कंपनी द्रोणागिरी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचा 32 टक्के हिस्सा आहे.
मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्सने 13 डिसेंबर 2024 रोजी एक्सचेंजेसना कळवले होते की, शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ ऑफ महाराष्ट्र लिमिटेड म्हणजे सीडको द्वारे प्रथम नकाराचा अधिकार सोडल्यानुसार, त्यांनी नवी मुंबई IIA प्रायव्हेट लि. चे 57.12 कोटी इक्विटी शेअर्स सुमारे 74 टक्के 28.50 रुपये प्रति इक्विटी शेअर या किमतीने खरेदी केले आहेत, ज्याचे मूल्य 1,628.03 कोटी रुपये आहे. त्याद्वारे 5,286 एकर प्रकल्पाचे इक्विटी मूल्य 2,200 कोटी रूपयांच्या घरात जाते. या व्यवहाराची संपूर्ण माहिती रिलायन्स समूहाकडून शेअर बाजाराला देण्यात आलेली आहे.