शिर्डी संस्थानने (Shirdi Sansthan Decision) मोठा निर्णय नवीन वर्षात घेतल्याचं समोर आलंय. आता साईबाबांची (Sai Baba) आरती करण्याचा मान सामान्य भाविकाला मिळणार आहे. संस्थानने साईभक्तांना नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अनोखी भेट दिली आहे. आता साईबाबांच्या आरतीचा मान तासनतास रांगेत उभं राहणाऱ्या साईभक्तांच्या जोडीला दिला जाणार आहे.
पंढरपूरच्या धर्तीवर साई संस्थानने घेतलेल्या या निर्णयाची आज म्हणजेच 1 जानेवारी 2025 अंमलबजावणी सुरू करण्यात आलीय. नववर्षाच्या पहील्याच दिवशी साईबाबा संस्थानने सामान्य साईभक्तांना मोठी भेट दिलीय. दररोज होणाऱ्या आरतीला आता साई बाबांच्या एका (Shirdi News) भाग्यशाली जोडीला आरती करताना पुढे उभं राहण्याचा मान मिळणार आहे. साईबाबांची माध्यान्ह, धूप आणि शेज आरतीच्या वेळी ही भाग्यशाली जोडी सर्वात पुढे असणार आहे.
पण आता ही जोडी कोणती असणार? हा देखील प्रश्न निर्माण होतोय. तर सामान्य दर्शनरांग आरती सुरू होण्यापुर्वी थांबवली जाते. त्यावेळी जी जोडी सर्वात पुढे असेल तिला आरतीचा लाभ मिळणार आहे. साईबाबांच्या माध्यान्ह आरतीपासून आज ही योजना सुरू झालीय. साई बाबांची आरती करणारं पहिलं भाग्यशाली जोडपं ठरलंय. हे जोडपं तब्बल चारतास दर्शन रांगेत उभं होतं. त्यानंतर त्यांना आरतीचा मान मिळाला, हे या दांपत्याने बोलून दाखवलं आहे. यापूर्वी ही संधी फक्त सशुल्क पास धारक, दानशूर भाविक आणि अतिमहत्वाच्या व्यक्तींनाच मिळत होती.
साई संस्थानने सुरू केलेल्या या योजनेमुळे भाग्यशाली सामान्य साईभक्ताला देखील साईबाबांची आरती करताना आता व्हीव्हीआयपीचा दर्जा मिळाला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी साईबाबांना 13 लाख 30 हजार रुपये किमतीचा सुवर्ण हार अर्पण करण्यात आलाय. बबिता टीकू आणि परिवाराकडून साईचरणी हा हार अर्पण करण्यात आलाय. आजच हा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण हार साई मूर्तीला परिधान करण्यात आला. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दर्शन घेण्यासाठी साई मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती.