राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि त्यात एकुण ३९ मंत्र्यांनी मंत्रिपदाची (Maharashtra Cabinet Expansion) शपथ घेतली. खातेवाटपही जाहीर झालं मात्र, तरीही काही जणांनी अद्यापही मंत्रीपदाचा पदभार स्वीकारलेला नाही आहे. अशातच आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (NCP) नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Jhirwal) यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि त्यावेळी शरद पवारांप्रती (Sharad Pawar) असलेली भावना त्यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली. ‘मी पांडूरंगाला साकडं घालेन, पवार साहेबांना पांडुरंगाच्या जागेवर पाहून सगळे मिळून पवार साहेबांना एकत्र येण्याची विनंती करु’ असं विधान त्यांनी केलं.
Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाची पहिल्या बैठकीत, शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय
‘जर माझी छाती फाडली तर शरद पवार दिसतील, असं मी म्हटलं. मात्र, काही लोकांनी याचा गैरप्रचार केला. जेव्हापासून शरद पवारांना सोडून अजित पवारांकडे गेलो, तेव्हापासून आजपर्यंत शरद पवारांना भेटलेलो नाही. याचं कारण कोणत्या तोंडाने शरद पवारांच्या समोर जायचं? एवढ्या दिवस गेलो नाही. मात्र, आता शरद पवारांकडे जाणार आणि लोटांगण घालून पाया पडणार आणि साहेब काहीही करा पण आमच्या सारखे अनेक आहेत, ज्यांना अडचण झालेली आहे म्हणून एकत्र या असं म्हणणार.” असं म्हणत मनातील खदखद त्यांनी व्यक्त केली. यावर आज राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.
‘शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का? हा प्रश्न मला कधीही विचारु नका. झिरवाळ यांनी नौटंकी वगैरे करायची गरज नाही. शरद पवार माणूस आहेत आणि त्यांना हृदय आहे. दैवत म्हणत आहेत, दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का? झिरवाळांना उपसभापती कुणी बनवलं होतं? शरद पवार यांच्या दुःखाचा विचार केला आहे का? असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नरहरी झिरवाळ यांना विचारला तर, आम्हाला सत्ता चाटण्याची गरज प्रत्येकवेळी वाटत नाही असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे