विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आज (दि.2) सत्तेत आलेल्या महायुती सरकराची पहिली मंत्रिमंडळाची (Cabinet Meeting) बैठक मुंबईत पार पडली. यात शासकीय कर्मचाऱ्यांच्या बँकेतील वेतन खात्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यापैकी सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराची खाती आता मुंबै बँकेत उघडण्यात येणार आहेत.मंत्रिमंडळाच्या या निर्णयानुसार आता शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास तसेच महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीस प्राधिकृत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला आहे.
Cabinet Meeting मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले?
– महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम-220 मध्ये आकारी पड जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय (महसूल विभाग)
– शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास तसेच महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीस प्राधिकृत करण्यास मंजुरी आणि त्यासाठी निकष शिथिल (वित्त विभाग)
Cabinet Meeting मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर काय म्हणाले?
मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानंतर मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, शासनाच्या यादीवर मुंबई जिल्हा बँकेला घेऊन व्यवहार करण्याची मुभा दिल्याबद्दल दरेकर यांनी शासनाचं आभार मानले आहेत.
Cabinet Meeting बैठकीला अजितदादांची अनुपस्थिती
आज पार पडलेल्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दत्तात्रय भरणे हे आले नाहीत. परंतु मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे चर्चेत आले आहेत. त्यामुळे मुंडे उपस्थित राहतील की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. पण, मुंडे या बैठकीला आले होते. यावेळी बैठकीत फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संपूर्ण आढावा घेतला. अजितदादा सध्या परदेशात असल्याने ते बैठकीला आले नसल्याचे सांगितले जात आहे. तर, दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर अद्याप अजित पवारांनी कोणत्याही प्रकारचे भाष्य केलेले नाही.