भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांचे गुरुवारी २६ डिसेंबर रोजी निधन झाले.फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याने वयाच्या ९२ व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशभरात शोक व्यक्त होत आहे. २६ सप्टेंबर १९३२ साली जन्मलेले मनमोहन सिंग हे राजकारणी आणि अर्थतज्ञ म्हणून ओळखले जात होते. २००४ ते २०१४ पर्यंत भारताचे पंतप्रधान असलेले मनमोहन सिंग हे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर सर्वाधिक काळ हे पद भूषवणारे भारताचे चौथे पंतप्रधान बनले. आपल्या कौशल्याने वेगळी ओळख निर्माण करणारे डॉ.मनमोहन सिंग यांना एका टोपण नावाने ओळखलं जायचं. ते नाव होतं. ब्लू टर्बन…
एक महान राजकारणी, लोकाभिमुख, लोककल्याणकारी असं व्यक्तीमत्त्व देशाला लाभलं. १९९१ च्या तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांच्या कार्यकाळात त्यांनी अर्थमंत्रीपदाची धुरा सांभाळली. देशाच्या पंतप्रधान पदी विराजमान झालेले पहिले शीख पंतप्रधान होते. सार्वजनिक जीवनात विविध जवाबदाऱ्या पार पाडताना त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यात सिंहाचा वाटा उचलला. या व्यक्तिरिक्त, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू म्हणजे त्यांची निळी पगडी. ही निळी पगडी त्यांच्या शांत स्वभावाचे आणि सालस व्यक्तीमत्त्वाचे प्रतीक तर बनलीच पण त्यांच्या आयुष्यात राजकारणाच्या कारकिर्दीत त्या निळ्या पगडीचे विशेष महत्त्व होते.
डॉ.मनमोहन सिंग यांच्या डोक्यावर कायम निळी पगडी असायची. या निळ्या पगडीची कहाणी ही २००६ पासूनची आहे आणि त्या मागचं कारण त्यांनी स्वत: सांगितलं होतं. २००६ साली डॉ.मनमोहन सिंग यांना केंब्रिज विद्यापीठात कायद्याची डॉक्टरेट पदवी देण्यात आली. त्या वेळी एडिनबर्गचे तत्कालीन ड्यूक आणि विद्यापीठाचे कुलपती प्रिन्स फिलिप यांचं लक्ष डॉ.मनमोहन सिंग यांच्या निळ्या पगडीने वेधून घेतलं आणि त्यावेळी डॉ.मनमोहन सिंग यांनी निळ्या पगडी ची खास गोष्ट सांगितली.
त्यांनी सांगितलं की, मी केंब्रिज विद्यापीठात शिकत होतो त्यावेळी मी निळी पगडी घालायचो. या वरुन माझ्या मित्रांनी मला ‘ब्ल्यू टर्बन’ असं टोपण नाव ठेवलं होतं. मला निळा रंग विशेष आवडतो म्हणून मी निळ्या रंगाची पगडी घालतो. त्यामुळे त्यांची पगडी ही नेहमी निळ्याच रंगाची असायची आणि हीच पगडी त्यांची विशेष ओळख बनली. ही निळी पगडी विद्यार्थीदशेपासून थेट पंतप्रधानस होईपर्यंतच्या प्रवासात त्यांची सोबती बनली. पण याच निळ्या पगडीची माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी अर्ध्यातच सोडली.