कल्याण येथील चक्कीनाका भागातील (Kalyan Case) एका बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणारा विशाल गवळी हा भाजपचा कार्यकर्ता आहे, असा दावा माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी केला. त्यांच्या या दाव्याने खळबळ माजली आहे. तसेच विशाल गवळींवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. माजी आमदारांनी त्याला वेळोवेळी पाठबळ देऊन सोडविले, असा आरोप देखील महेश गायकवाड यांनी केला आहे. गायकवाड यांच्या विधानांवरून बालिका हत्येच्या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे.
विशाल गवळीने केलेल्या बालिकेच्या हत्येविषयी कल्याण परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. अनेक सामाजिक संस्था, राजकीय पक्ष या घटनेचा निषेध करण्यासाठी कोळसेवाडी पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चे आणून विशाल गवळीला फाशीची शिक्षा किंवा त्याला लोकांच्या ताब्यात देण्याची मागणी करत आहेत. विशाल आणि त्याची पत्नी साक्षी यांच्या विषयी लोकांच्या भावना तीव्र आहेत. काही जागरूक नागरिक कोळसेवाडी पोलीस ठाण्यात विशालवर कठोर कारवाई करावी म्हणून निवेदने घेऊन येत आहेत.
प्रसार माध्यमांशी बोलताना महेश गायकवाड यांनी दावा केला आहे कि विशाल गवळीने यापूर्वीच्या निवडणुकीत भाजपाचे काम केले आहे. त्याचे व्हिडिओ आपल्याकडे असून पुरावे दाखवू शकतो. विशालने कोणताही गुन्हा केला की त्याला यापूर्वीचे आमदार सोडवायचे. त्यामुळे त्याची हिम्मत वाढत गेली. त्याला प्रत्येक गुन्ह्यात शिक्षा झाली असती तर बालिकेची हत्या झालीच नसती. विशाल गवळी हा भाजपाचा कार्यकर्ता असल्याने एवढा मोठा गुन्हा करूनही त्याला फाशी किंवा अन्य कठोर शिक्षा होते की नाही, याबद्दल शंका आहे. जोपर्यंत विशाल फासावर लटकवला जात नाही तोपर्यंत आम्ही उग्र आंदोलन करत राहणार असल्याचेही महेश गायकवाड यांनी सांगितले.
आपल्यावर भर पोलिस ठाण्यात गोळीबार करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक केली जात नाही. माजी आमदारामुळे कल्याण पूर्वेत गुंडगिरी वाढली आहे. विशाल गवळी आणि त्याचे कुटुंब भाजपाशी संबंधित असल्याचा आरोप असताना या संदर्भात भाजपाचे स्थानिक पदाधिकारी का बोलत नाहीत, असा प्रश्न गायकवाड यांनी उपस्थित केला. बालिकेच्या हत्येमधील आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत कल्याणची जनता स्वस्थ बसणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशालला फाशी होईल यादृष्टीने पावले उचलावीत, असे आवाहन महेश गायकवाड यांनी केले.
या संदर्भात भाजपाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी स्पष्टीकरण देताना महेश गायकवाड यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले कि विशाल गवळी याचा भाजपाशी काडीचाही संबंध नाही. तो भाजपाचा साधा कार्यकर्ता किंवा सक्रिय सदस्य देखिल नाही. विशाल गवळी याने निवडणुकीत कुणाचे काम केले वा केले नाही याचा भाजपाशी काही संबंध नाही.
दुसरीकडे विशाल गवळीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पोलीस सर्व पुरावे गोळा करत आहेत. पोलीस तपासादरम्यान कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत यादृष्टीने पोलीस काम करत आहेत. विशाल गवळीने प्रत्येक गुन्ह्यात मिळविलेला जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी प्रक्रिया सुरू केलीय. किती आरोपींना मानसिक रुग्णाचा दाखला देण्यात आला आहे. यासाठी केडीएमसी, ठाणे सिव्हील, मेंटल रुग्णालय आणि मुंबईतील रुग्णालयांना पत्र देऊन पोलिस माहिती घेणार आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिलीय.
2014 पासून आतापर्यंत विशाल विरोधात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, अल्पवयिन मुलावर लैंगिक अत्याचार, हत्येचा प्रयत्न, लूट, तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी विशाल गवळीवरील आठ गुन्ह्याचे जामीन रद्द करण्याची मागणी पोलीस करणार आहेत. न्यायालयाने ज्या अटी शर्तीवर विशाल गवळीला जामीन दिला होता, त्या अटी न पाळता आरोपी गुन्हे करत असल्याने त्यांच्या सर्वच गुन्ह्यातील जामीन रद्द करण्यासाठी कल्याण कोळसेवाडी पोलीस न्यायालयात प्रक्रिया सुरू करणार आहेत. विशाल गवळीवर दहा वर्षात नऊ गुन्हे दाखल असून यापैकी ८ गुन्ह्यात तो जामीनावर बाहेर आहे.