राज्यात थंडीचा जोर ओसरला आहे. हवामान विभागाने 27 आणि 28 डिसेंबर रोजी (Maharashtra Weather) राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार काही भागात पावसाने हजेरी लावली. आजही अनेक ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. खरंतर उत्तर भारतात थंडीचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे येथून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे.
अवकाळी पावसामुळे मात्र कोकण किनारपट्टीवरील वातावरणात बदल झाला आहे. मुंबईत तापमानात वाढ झाली आहे. पूर्वेकडील वाऱ्याच्या प्रभावामुळे अग्नेय अरबी समुद्रापासून उत्तर कोकणापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात पुढील काही दिवस हवामानात चढउतार राहिल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामध्ये थंडीची तीव्रता मात्र वाढणार असल्याचे सांगण्यात आले.
शनिवारी पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे विदर्भ आणि खानदेशातील काही जिल्ह्यांत अवकाळी पाऊस झाला. गारपिटीचाही तडाखा बसला. या अवेळी झालेल्या पावसाने शेती पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले. या ठिकाणी गारपीट झाली. पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची स्थिती कायम राहिल. यानंतर आजपासून (रविवार) विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणी वगळता राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर राहिल आणि सोमवारपासून थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज आहे.
राज्यात पुढील काही दिवस तापमानात चढउतार दिसून येईल. येत्या तीन ते चार दिवसांत थंडीची तीव्रता वाढणार आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून अरबी समुद्रातून आलेल्या वाऱ्यांमुळे मुंबईच्या वातावरणात मोठा बदल झाल्याचे जाणवत आहे.