बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राजकारण ढवळून निघालं आहे. या हत्याकांडातील आरोपी अजूनही मोकाट असल्याने नागरिकांत रोष वाढू लागला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा निघाला आहे. याआधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कठोर शब्दांत इशारा दिला आहे. मुख्यमंत्री साहेब तुम्ही लक्षात ठेवा यांना पाठीशी घालू नका अन्यथा तुम्हाला पश्चाताप होईल असा इशारा जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करुन त्यांना बेदम मारहाण करून निघृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेला आता तीन आठवडे उलटून गेले आहेत. तरी देखील मारेकऱ्यांना गजाआड करता आलेलं नाही. विरोधकांनी हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच लावून धरला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर देत या प्रकरणाची न्यायायलयीन आणि एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येईल असे सांगितले होते.
पोलीस तपास सुरू असतानाच आज बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला आहे. याआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, मुख्यमंत्री साहेब तुम्ही लक्षात ठेवा, यांना पाठीशी घालू नका. अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होईल. तुम्ही आरोपींना अटक करा, असा इशारा त्यांनी दिला. आता राज्यभरात जिल्ह्याजिल्ह्यात मोर्चे काढण्यात येणार आहेत असेही जरांगे पाटील म्हणाले.
धसांचं विधान अन् प्राजक्ता माळीचं नाव; तक्रारीच्या चर्चांमध्ये चाकणकरांनी दिली मोठी अपडेट
बीड जिल्ह्यातील जनतेला माझं आवाहन आहे की या मोर्चात सहभागी व्हा. यातून जर सरकारला जाग आली नाहीच तर आम्ही सरकारला जाग आणण्याचं काम करू. या घटनेत न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. या घटनेत सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष असो कुणीही राजकारण करता कामा नये. दोघांनीही माणुसकी जिवंत ठेवली पाहिजे. घटनेचं गांभीर्य ओळखून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर आरोप करणं आता बंद करायला हवं असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.