ओतूर प्रतिनिधी रमेश तांबे
पुणे : पाथरटवाडी रोडने, दुचाकीवरून घरी परतणाऱ्या एका इसमावर बिबट्याने हल्ला केल्याने, सदरचा इसम गंभीर जखमी झाला आहे. सदरची घटना गुरूवार दि.२६ डिसेंबर रोजी रात्री सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घडली. संपत यशवंत पानसरे वय ४७ वर्ष रा.ओतूर (रहाटी मळा), ता.जुन्नर असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. पानसरे यांच्यावर नारायणगाव येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मागील पंधरा दिवसात, याच ठिकाणी बिबट्याने चार जणांवर हल्ला करून, त्यांना जखमी केल्याने येथील महिला नागरिक व शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सदरची घटना घडल्यानंतर या परिसरातील नागरिक महिलांनी आक्रमक पवित्रा घेत शुक्रवार दि.२७ डिसेंबर रोजी सकाळी ओतूर येथील वनपरिक्षेत्र कार्यालयावर ठिय्या मांडला. बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त झालाच पाहिजे. या परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना शाळेमध्ये ये-जा करताना भीती वाटत आहे. हल्ला झालेल्या ठिकाणी वनविभागाने, रात्रीच्या वेळेस गस्त घालावी तसेच वनविभागाने नागरिकांना हेल्पलाइन दूरध्वनी क्रमांक मदतीसाठी ठेवावा.
या परिसरातील बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याच्या घटनांमुळे मजूर देखील शेतात येईना, यामुळे शेतकरी देखील भयभीत झालेले आहेत. वनविभागाने पिंजरा लावताना त्यामध्ये भक्ष ठेवावे. तसेच बिबट प्रतिबंधक लस येथील शासकीय रूग्णालयात याच ठिकाणी उपलब्ध करून द्यावी.तसेच वाडी- वस्त्यांच्या मार्गावर पथदिवे किंवा सौरदिवे बसवावेत अशी देखील मागणी उपस्थित नागरिक महिला यांच्या वतीने करण्यात आली.
हल्ला झालेल्या ठिकाणी पाच पिंजरे लावले असून, त्यात भक्ष टाकून,सदर बिबट्यास तात्काळ जेरबंद करणार आहे, तसेच बिबट्याने हल्ला केल्यानंतर, जखमी व्यक्तीस ओतूर येथील शासकीय रूग्णालयात लस उपलब्ध करून देण्यात येईल.
घटनास्थळी रेस्क्यू टीम चे सदस्य तसेच वनकर्मचारी हे रात्री गस्त घालणार असून ते वन्य प्राण्यांबद्दल माहिती देऊन, स्वसंरक्षणार्थ उपाययोजना सांगून, जनजागृती करण्यात येत आहे. बिबटप्रवण क्षेत्रातून वाहनाद्वारे जात असताना वाहनाचे हॉर्न मोठ्याने वाजवावा जेणेकरून रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसलेले वन्यप्राणी त्यांची जागा बदलतील.
लहू ठोकळ, वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर –
या आंदोलन प्रसंगी ओतूर गावच्या सरपंच छाया तांबे, उपसरपंच प्रशांत उंबरे, श्री कपर्दिकेश्वर देव-धर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे,श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक धनंजय डुंबरे, सामाजिक कार्यकर्ते तानाजी तांबे, स्वप्निल अहिनवे, राजेंद्र गीते, ज्ञानेश्वर घुले, ज्ञानेश्वर पाथरट, नाना गीते, बाळासाहेब गीते,संदीप पानसरे,सुभाष मालकर,अक्षय मालकर,विशाल घुले,राजेंद्र शिंदे, नंदू गीते, संदीप पानसरे,विनोद सावंत,उल्हास पाथरट, संजय घुले, जनार्दन गीते,दीपक घुले,अनिल कुटे,बबन गीते,प्रकाश पानसरे, दत्तात्रय मालकर,नामदेव गीते,सिंधुबाई मालकर,चंद्रभागा मालकर, सुभद्रा मालकर,स्नेहल शेळके,प्रियंका मालकर,अश्विनी मालकर आदी नागरिक यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरिकांच्या वतीने ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांना निवेदन देण्यात आले.