सध्या नवंनवीन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. मात्र मराठी चित्रपटांना महाराष्ट्रात थिएटर्स मिळत नसल्याचं सांगत अनेक मराठी कलाकारांनी खंत व्यक्त केली. काही दिवसांआधी मराठी अभिनेत्री आणि स्टार प्रवाह वरील प्रसिद्ध मालिका ‘प्रेमाची गोष्ट’या मालिकेत काम करणारी तेजश्री प्रधान हिने तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘हॅशटॅग तदेव लग्नम’या चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली होती. या पाठोपाठ आता मराठी सिनेसृष्टीतील आणखी एका मराठी कलाकाराने याबाबत एक पोस्ट शेअर करत खंत व्यक्त केली आहे.
‘श्री गणेशा’ या सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमात मुख्य भूमिकेत असलेला कलाकार म्हणजे ‘प्रथमेश परब’याने आपल्या इन्स्टाग्राम वर एक पोस्ट शेअर करत मनातील खदखद व्यक्त केली. त्याने एक पोस्ट शेअर केली त्यात,’एखाद्या सिनेमासाठी संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेते. त्याच्या स्क्रिप्टवर, व्यक्तिरेखेवर, नकळत प्रेम जडू लागतं. अगदी जीव ओतून सिनेमा बनवला जातो. आपली व्यक्तिरेखा, त्यातलं वेगळेपण मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचून त्यांचं मनोरंजन करता यावं असं प्रत्येक कलाकाराला वाटतं.
पुढे तो असं म्हणाला की, चित्रपट प्रदर्शित होतो. प्रेक्षकांना तो फार आवडतो. थिएटर Visit केल्यानंतर त्याच्या live reactions, त्यांच्या डोळ्यांतील अश्रू, आशीर्वाद, आमच्याशी भरभरुन साधलेला संवाद हे सगळं अनुभवायला मिळतं. आज प्रेक्षकांना सिनेमा बघायचाय…पण, तो दाखवायला आमच्याकडे थिएटर्सच नाहीत.अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या आपल्या मराठी भाषिक सिनेमाला महाराष्ट्रात स्क्रीन मिळत नाही, यापेक्षा दुर्देवी काय असू शकतं…अशा आशयाची पोस्ट त्याने शेअर केली आहे. प्रथमेश परबच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत नाराजी व्यक्त केली आहे. तर काहींनी त्याला पाठींबा देखील दिला आहे.