सध्या मेलबर्नमध्ये बोर्डर गावस्कर कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेचा आज दुसरा दिवस असून या सामन्यात टीम इंडियाचे खेळाडू हाताला काळ्या फिती लावून मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. २६ डिसेंबरला देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांचे वयाच्या ९२ व्या वर्षा निधन झाले. डॉ.मनमोहन सिंह यांच्यासारखा अर्थव्यवस्थेचा हिरा देशाने गमावला. माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी संपूर्ण टीम इंडियाचे खेळाडू हाताला काळी फिती लावून मैदानात उतरले आहेत.
भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांना गुरुवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सर्वतोपरी उपचार सुरु होते, मात्र काळाने घात केला. २००४ ते २०१४ पर्यंत भारताचे पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंह हे देशाचे चौथे पंतप्रधान बनले. देशाच्या माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी काळी पट्टी बांधून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.तर टीम इंडियाच्या माजी खेळांडूनी दिवगंत माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली अर्पण करत शोक व्यक्त केला आहे.
‘आमचे माजी पंतप्रधान श्री मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो. ओम शांती. असं म्हणत विरेंद्र सेहवाग याने श्रद्धांजली अर्पण केली तर, भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगनेही शोक व्यक्त करत म्हटले की, ‘डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाची दु:खद बातमी. भारताच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम घेणारे द्रष्टे नेते आणि खरे राजकारणी. त्यांची बुद्धी आणि नम्रता सदैव स्मरणात राहील. त्यांच्या प्रियजनांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना.’ अशा भावना त्याने व्यक्त केल्या.