आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्या जीवनसाथीची गरज असते. अनेक वर्ष काम करुन सेवानिवृत्तीनंतर सुखाचा वेळ आपल्या पत्नीसोबत, कुटुंबासोबत घालवायला मिळेल अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र राजस्थान मधील कोटा येथे एका सेवानिवृत्ती कार्यक्रमात काळाने घात केल्याचा धक्कादायक घटना घडली. देवेंद्र संदल हे कोटा येथील डकानिया येथे मध्यवर्ती गोदामात व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. सात महिन्यापूर्वी कामानिमित्त ते कोटा येथे आले. देवेंद्र संदल आणि टीना संदल यांचा सुखाचा संसार सुरु होता. अपत्य नसल्याने पत्नी अस्वस्थ असायची. पत्नी आजारी असल्याने देवेंद्र यांना सतत पत्नीची काळजी वाटायची म्हणून त्यांनी सेवानिवृत्तीच्या तीन वर्षांआधीच व्हिआरएस घेण्याचा निर्णय घेतला.
आपल्या ऑफिसच्या शेवटच्या दिवशी सेवानिवृत्तीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पत्नी टीना संदल देखील उपस्थित होत्या. रोज अस्वस्थ असणाऱ्या टीना संदल या आपल्या पतीच्या सेवानिवृत्त कार्यक्रमाला आनंदी आणि उत्साही दिसत होत्या. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. स्वेच्छा निवृत्तीला पती देवेंद्र संदल यांचा हार घालून सन्मान करण्यात आला. त्यानंतर एकत्र फोटो काढत असताना देवेंद्र संदल यांच्या पत्नीला चक्कर आली.
‘मला चक्कर येत आहे.’ असं म्हटंल्याने पती चिंतेत येऊन आपल्या पत्नीची पाठ थोपटली.मात्र हेच शब्द शेवटचे ठरतील असा विचार कोणीच केला नाही. ऑफिस मधील कर्मचाऱ्यांनी त्यांना पाणी दिले.तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले मात्र त्या आधीच टीना संदल यांनी आपला प्राण सोडला. ज्या पत्नीसाठी निवृत्ती आधी स्वेच्छा निवृत्ती घेतली त्याच पत्नीने निवृत्तीच्या दिवशी साथ सोडली. आपल्या सेवानिवृत्तीला पत्नी साथ सोडेल असं स्वप्नात देखील विचार न करणाऱ्या देवेंद्र संदल यांच्यावर काळाने घात केला.