-1.9 C
New York

Dhananjay Munde : देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे स्पष्टच बोलले

Published:

बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर विरोधकांनकडून गंभीर आरोप करण्यात येत आहे. तर आता या प्रकरणात भाष्य करत मंत्री धनंजय मुंडे विरोधकांवर या घटनेवर राजकारण करण्याचा आणि आपली प्रतिमा मलिन करण्याचा आरोप केला आहे. ते आज सह्याद्री अतिथी गृह येथे संपन्न झालेल्या या आढावा बैठकीनंतर माध्यमंशी बोलत होते.

यावेळी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना व त्यांचे जे कोणी सूत्रधार असतील त्यांना फाशीच दिली जावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची मागणी असून या प्रकरणातील तपास पूर्ण करून तातडीने याची चार्ज शीट दाखल करून हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवले जावे व देशमुख यांच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळवून दिला जावा ही माझी पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे. अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी दिली.

पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, बीड जिल्ह्यातील एका तरुण सरपंचाची हत्या झाली, हे प्रकरण अत्यंत दुर्दैवी आणि तितकेच भयानक आहे, त्यामुळे यातील कुठल्याही आरोपीचे, तो कुणाच्याही जवळचा असला तरी समर्थन केले जाऊ शकत नाही, त्यामुळे सरकार म्हणून या प्रकरणांमध्ये कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही तसेच या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढण्याच्या दृष्टीने पोलिसांचा तपास वेगाने सुरू असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.

दरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले की या घटनेच्या आडून बीड जिल्ह्यामध्ये अनेक जणांकडून वेगळ्या पद्धतीचे राजकारण केले जात आहे. मला मंत्री पद मिळू नये, पालकमंत्री पद मिळू नये, यासाठी या घटनेचे दुर्दैवी राजकारण केले गेले व यातून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार सातत्याने सुरू आहे.

काही जणांचा तर दिवसच माझ्यावर टीका करण्यात व या घटनेशी कसलाही संबंध नसताना तो जोडायचा प्रयत्न करण्यात उजडतो आहे. या घटनेच्या आडून मला सामाजिक व राजकीय आयुष्यातून उठण्याचा काही जणांचा डाव आहे मात्र, ही घटना दुर्दैवी असून त्यातील आरोपींना फाशी मिळावी व खरे सूत्रधार समोर यावेत ही माझी भूमिका आहे व ती पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे. त्यामुळे ज्यांना आरोप करायचे आहेत त्यांना करू द्या, अखेर घटनेतील सत्य व सूत्रधार समोर येईलच, असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img