या वर्षी एका वेगळ्याच वादात अडकलेल्या माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्या अटकेसाठी पुण्यातील बाणेर येथील त्यांच्या घरी पुणे पोलिस दाखल झाले आहेत. मात्र पूजा खेडकर अजुनही पोलिसांच्या हाती लागलेल्या नाहीत, अशी माहिती मिळालेली आहे. पुणे पोलीस हे कालपासूनच पूजा खेडकर यांच्या मागावर आहेत. परंतु अजुनही पूजा खेडकर गायबच आहेत. त्यामुळे माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना शोधण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. पोलीस पूजा खेडकर यांच्या शोध मोहिमेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी आपली पथके पाठवू शकतात. अशाचमुळे आता पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
या आधीच पूजा खेडकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला होता. पूजा खेडकर यांनी नागरी सेवा परीक्षेत कथित फसवणूक आणि ओबीसी तसेच अपंगत्व कोट्याचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याच्या आरोपाखाली चाललेल्या खटल्यात त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. परंतु काल दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांनी केलेल्या अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळत त्यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. त्यामुळे कालपासूनच पूजा खेडकर यांना पुणे पोलीस कोणत्याही क्षणी अटक करु शकतात, अशी शक्यता वाढली आहे. आता पोलिसांचे पथकच त्यांच्या बाणेर येथील घरी पोहोचले आहे. पण पूजा खेडकर या त्यांच्या बाणेर येथील घरी सापडतील का? हा प्रश्न अजुनतरी अनुत्तरितच आहे.
पूजा या 2023 या वर्षातील आयएएस अधिकारी आहेत. त्यांना त्यांच्या प्रशिक्षणादरम्यान प्रक्षिणार्थी म्हणून पुण्यात नियुक्ती मिळाली होती. नियुक्ती मिळाल्यानंतर लगेचच त्यांच्याकडून अवाजवी मागण्या करण्यात आल्या. प्रशिक्षण सुरु असतानाच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वत:साठी स्पेशल केबिनची मागणी केली. यासोबतच त्यांना प्रशासकीय इतर सर्व सोयीसुविधाही हव्या होत्या. त्या प्रशिक्षणार्थी असल्याने त्यांना लगेच सर्व सुविधा मिळणार नाहीत असे सांगण्यात आले होते. तरीही त्यांच्याकडून अशा प्रकारच्या अवास्तव मागण्या येतच होत्या. नंतर त्यांच्या मागण्या व वागणुकीला त्रस्त हेऊन पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी त्यांच्याबद्दल राज्याच्या मुख्य सचिवांना लेखी तक्रारदेखील केली होती. नंतर त्यांची बदली वाशिममध्ये करण्यात आली होती.
यानंतर पूजा खेडकर यांच्याबाबत काही धक्कादायक माहिती समोर आली. पूजा खेडकर यांनी अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र व ओबीसीचे आरक्षण मिळवण्यासाठी खोटे क्रिमिलेयर प्रमाणपत्रही सादर करत परीक्षा उत्तीर्ण केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. शेवटी पूजा खेडकर यांना आयएएस प्रशिक्षण प्रबोधिनी लालबहादूर शास्त्री अकादमीमध्ये बोलावण्यात आले. पण त्या तिथे गेल्याच नाहीत. या प्रकरणी यूपीएससीने देखील कठोर भुमिका घेतली. आयोगाने लगेचच पूजा खेडकर यांच्याविरोधात चौकशी बसवली.
या प्रकरणाची यूपीएससीकडून चौकशी करण्यात आली आणि नंतर पूजा खेडकर यांचे पद रद्द करण्यात आले. पूजा खेडकर यांच्यावर आयोगाची फसवणूक केल्या प्रकरणी आता कायदेशीर कारवाई सुरु झाली आहे. दुसऱ्या बाजुला पूजा खेडकर यांनी न्यायालयात धाव घेतली होती. या सर्व प्रकरणावर आता न्यायालयामध्ये खटला सुरु आहे. याच खटल्यावर सुनावणी करताना खेडकर यांचा अटकपूर्व जामीन दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. आता त्यांच्यावर अटकेची तलवार लटकत आहे.