जत विधानसभा मतदारसंघातून भाजपचे नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे निवडणूक जिंकले आहेत. यानंतर त्यांचा काल 24 डिसेंबर रोजी सांगलीच्या आटपाडीत सत्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये पडळकरांनी आटपाडी आणि जत येथील जनतेचे आभार मानले. यावेळी पडळकर म्हणाले की, ज्या भावनेनं मला आमदार केलं, सन्मान केलं. माझ्या आयुष्यात जतच्या मातीच्या सन्मान वाढेल, असंच काम करणार, असा शब्द पडळकर यांनी जतकरांना दिलाय. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर (MVA) निशाणा साधला आहे.
सभेत बोलताना गोपीचंद पडळकर (BJP Leader Gopichand Padalkar) म्हणाले की, मला तिकीट देवू नये म्हणून काही लोकांनी जंग जंग पछाडलं. सगळे नेते माझ्या विरोधात गेले होते. पण जनता माझ्यासोबत होती. आझाद मैदानावर आंदोलन एसटीचं आंदोलन सुरू केलं होतं. महाविकास सरकारने माझ्यावर 370 कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. एसपींनी अटकेंचं फर्मान काढलं होतं, परंतु तुम्ही माझ्यासोबत असल्यामुळं ते मला अटक करू शकलं नाही असा गौप्यस्फोट देखील गोपीचंद पडळकर यांनी केलाय.
फडणवीस सरकारकडून 12 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
मंत्रिपद मिळालं नाही म्हणून बारीक तोंड करू नका. संघर्षाचे दिवस संपले आहेत, आपलं सरकार आलंय. आमची सत्ता गेल्यावर देखील आम्ही ताकदीने लढलो. सरकारच्या विरोधात लढायची कोणाची हिंमत आहे का? असा सवाल देखील त्यांनी भाषणातून केलाय. मला विधानसभेत जतच्या लोकांनी पाठवलं आहे, तिथे मी गरीबांची बाजू ताकदीने लावून धरणार आहे. गावातली जनता एक झाली, तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणून मी नेता झालोय.
आपण सतरा वर्ष एकसोबत आहोत. पडळकर म्हणाले की, हे राज्य प्रचंड जातीयवादी आहे. ते आपण बदलू शकत नाही. महाराष्ट्र फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या विचारावर चालतो हे फक्त भाषणापुरतंच आहे. जातीच्या भिंती तोडून आपल्याला वैचारिकपणे एकत्र यावं लागणार आहे. संघर्षाचे दिवस आता संपलेत, आपलं सरकार, आपला लेक मुख्यमंत्री झालाय, असं वक्तव्य देखील पडळकरांनी केलंय.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या माध्यमातून माझ्यासाठी स्लॅब टाकला. जतच्या माझ्या मायबाप जनतेनं शिखर बांधलं. तुम्ही अजिबात घाबरू नका, मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पूर्ण वेळ पाठपुरावा करून आपल्या भागासाठी सर्व विभागांचा जास्तीत जास्त निधी आणेन, असं आश्वासन देखील पडळकरांनी जनतेला दिलाय.