सध्या बीड आणि परभणी हत्ये प्रकरणावरुन राजकीय विश्वात खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकाटीपण्णी पाहायला मिळत आहे. अशातच आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी,”परभणी आणि बीडमध्ये ज्या घटना घडल्या आहेत, त्या राज्याच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणाऱ्या आहेत. त्या भयंकर अपराधाशी संबंधित असलेले संशयित गुन्हेगार तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. मिस्टर फडणवीस, बीड आणि परभणीसंदर्भात ज्यांच्यावर लोकांचा संशय आहे, रोष आहे असे लोकं आपल्या मंत्रिमंडळात आहेत. छगन भुजबळांसारख्या नेत्याला दूर ठेवू शकता, पण खुनाचा संशय असलेल्या लोकांना मंत्रिमंडळात स्थान कसं मिळतं ?असा सवाल उपस्थित केला आहे.
खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधानांवर शाब्दिक हल्ला केला आहे. ते म्हणाले, “विरोधी पक्षानं, जनतेनं, नागरिकांनी काय करावं, कुठे जावं, काय खावं, कोणत्या भूमिका मांडाव्यात हे नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस ठरवणार ? या देशात लोकशाही आहे का ? महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर आहे हे फडणवीसांनी समजून घ्यावं.”तुम्ही छगन भुजबळ यांना मंत्रीमंडळातून दूर करू शकता, पण एका खुनाचा , कटकारस्थानाच संशय ज्याच्यावर आहे, अशा व्यक्तीला तुम्ही मंत्रीमंडळापासून दूर ठेवत नाही ? कारण तुमचं जातीचं राजकारण आहे. तुम्ही एक समाज वापरून घेताय, अशी टीका राऊतांनी फडणवीसांवर केली. काही आमदारांचा विरोध आहे म्हणून भुजबळांना दूर ठेवता, पण जिथे बीडसह महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेचा विरोध आहे. संतोष देशमुख यांच्या खुनाच्या कारस्थानात ज्यांचा संशयास्पद हात आहे, अशी व्यक्ती राज्याच्या मंत्रीमंडळात नको, अशा घोषणा अजित पवार यांच्यासमोर देण्यात आल्या. खऱ्या आरोपींना पकडण्याची हिंमत देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे का ? असं देखील संजय राऊत (Sanjay Raut)म्हणाले.
तर, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी काल परभणी आणि बीड मधील हत्येप्रकरणातील कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. त्यावर विरोधकांनी टीका केली. विरोधकांच्या टीकेला उत्तर देत, ‘राहुल गांधी परभणीत गेले म्हणून टीका करायच्या आधी, तुम्ही तेथे मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री म्हणून जायला हवं होतं, तुम्ही गेलात का ? तुम्हाला तिथे जाण्याची भीती वाटली, तिथे गेलात तरी बहुतेक सैन्य घेऊन तिथे जाल. अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) केली.