प्रतिनिधी : रमेश तांबे
ओतूर : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी तोतरबेट शिवारात बिबट्याच्या मादीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असल्याची माहिती ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना वनपरिक्षेत्र अधिकारी श्री ठोकळ म्हणाले की, पिंपळवंडी तोतरबेट (खोकलेवस्ती) शिवारामध्ये बिबट्याचा वावर असल्याने, या ठिकाणी पिंजरा लावण्यासाठी येथील नागरिकांनी ओतूर वनविभागाकडे मागणी केली होती, त्यानुसार वनविभागाने तोतरबेट (खोकलेवस्ती) शिवारामध्ये मागील तीन दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता.
मंगळवार दि.२४ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याची मादी जेरबंद झाली. सदर बिबट्याची मादी जेरबंद झाल्याची माहिती वनविभागाला मिळताच, वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल सोनवणे, वनरक्षक ज्ञानेश्वर साळुके, रेस्क्यू टीमचे सदस्य रोशन नवले, रोहित बोडके, शंकर मधे हे घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने बिबट्याच्या मादीला रेस्क्यू करून, माणिकडोह बिबट निवरा केंद्रामध्ये हलविण्यात आले आहे.
सदर बिबट्याच्या मादीचे वय दोन ते तीन वर्षे असल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले. तसेच या परिसरामध्ये आणखी काही बिबट्यांचा वावर असल्याने, वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावलेला आहे.