राज्याच्या विधानसभा निवडणूकीत ( Maharashtra Assembly Election) महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला (Mahayuti) मोठ्याप्रमाणात मतं दिली होती, मात्र प्राप्त माहितीनुसार त्याच महाराष्ट्राच्या चित्ररथाला आगामी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यातील (Republic Day Parade) संचलनात परवानगी मिळालेली नसल्याचे समजले आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच 26 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) कार्यक्रमात राजपथ म्हणजेच कर्तव्यपथावरील प्रतिष्ठेच्या संचलनासाठी 15 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ निवडण्यात आले आहेत. या यादीत महाराष्ट्राला सध्या तरी स्थान मिळालेले नसल्याची माहिती मिळाली आहे.
1971 पासून ते 2023 पर्यंत महाराष्ट्राच्या चित्ररथाला 14 वेळा उत्कृष्ट चित्ररथाचे पारितोषिक मिळालेले आहे. यामध्ये एकूण 7 वेळा पहिले पारितोषिक, 4 वेळेस दुसरे आणि 2 वेळेस तृतीय पारितोषिक मिळालेले आहे. याशिवाय सलग तीन वर्ष सर्वोत्तम चित्ररथाचे पहिले पारितोषिक मिळवण्याचा विक्रमही महाराष्ट्र राज्याच्या नावावर आहे. यातच आता पुढच्या वर्षी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याच्या यादीत महाराष्ट्राच्या चित्ररथाला तूर्तास स्थान मिळालेले नसल्याने अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.
Chhagan Bhujbal : मुख्यमंत्र्यांच्या भेटीत काय चर्चा झाली?भुजबळांनी थेट सांगितलं…
1981 मध्ये सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्यभिषेकाच्या चित्ररथास पहिले पारितोषिक मिळाले होते. त्यानंतर 1983 मध्ये बैलपोळा या चित्ररथास आणि 1986 मध्ये भारतीय स्वातंत्र्य संग्रामात (Indian Freedom Struggle) महाराष्ट्राचे योगदान या संकल्पनेवर आधारलेल्या चित्ररथास दुसरे पारितोषिक, 1988 मध्ये लोकमान्य टिळकांचा (Lokmanya Tilak) ऐतिहासिक खटला या संकल्पनेला दुसरे पारितोषिक मिळाले. 1993 मध्ये लोकमान्य टिळकांनी सुरु केलल्या सार्वजनिक गणेश उत्सवाचे शताब्दी वर्ष या चित्ररथास पहिले, 1994 मध्ये हापूस आंबा या चित्ररथास पहिले पारितोषिक मिळाले होते. 1995 मध्ये बापू स्मृती या चित्ररथासाठीही पहिले पारितोषिक मिळाले होते.
पहिल्या व दुसऱ्या पारितोषिकांनंतर राज्याला पुन्हा एकदा पारितोषिक मिळवण्यासाठी बरीच वर्षे वाट पहावी लागली होती. त्यात 2007 मध्ये जेजुरीचा खंडेराया यास तिसरे आणि 2009 मध्ये धनगर या चित्ररथास दुसरे पारितोषिक मिळाले होते. 2015 मध्ये “पंढरीची वारी” या चित्ररथास पहिले पारितोषिक, तर 2017 मध्ये लोकमान्य टिळक यांनी दिलेल्या ‘स्वराज्य माझा जन्मसिध्द हक्क आहे’ या घोषणेच्या शताब्दी महोत्सव व सार्वजनिक गणेशोत्सव अभियानाची 125 वर्षे या चित्ररथास तृतीय पारितोषिक मिळाले होते. यानंतर 2018 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा यास प्रथम आणि 2022 मध्ये महाराष्ट्राची जैवविविधता व राज्य मानके या चित्ररथास सर्वात लोकप्रिय चित्ररथाचे पहिले पारितोषिक मिळाले होते. गेल्या वर्षी 2023 मध्ये “महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती” या चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथाचे दुसरे पारितोषिक मिळाले आहे.
Pune Hit and Run : पुण्यात डंपरची धडक, निष्पाप जीवांचा मृत्यू
2024 या वर्षाच्या प्रजासत्ताक दिन नवी दिल्ली चित्ररथ संचलनात 28 राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेश यांच्याकडून विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी या दोन संकल्पनांवरती विविध राज्यांना आपापली चित्ररथे तयार करण्यास सांगितले होते. त्यानुसार महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराज यांचे 350 वे शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त शिवराज्याभिषेकाचा 350 वा महोत्सव आणि लोकशाहीची प्रेरणा या विषयांना घेऊन “लोकशाहीचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज” या संकल्पनेवर आधारित सादरीकरण संरक्षण मंत्रालयास करण्यात आले होते. तरी पुढच्या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त होत असलेल्या सोहळ्यात महाराष्ट्राचे चित्ररथ दिसेल का? हा प्रश्न आता राज्यात लोकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.