-7.7 C
New York

Sharad Pawar : सोमनाथ सुर्यवंशीला न्याय मिळवून द्यायची जवाबदारी आम्ही घेऊ

Published:

परभणीतील दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सुर्यवंशी (Somnath Suryavanshi) यांचा खूनच झाला असल्याचा आरोप पुन्हा एकदा त्यांच्या आईने केला आहे. आज परभणीत जाऊन राष्ट्रावादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP-SP) अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) सुर्यवंशी कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आई बोलत होत्या. पवारांसोबत बोलत असताना त्यांनी पोलिसांवर आरोपांची झोडच उठवली. तर सोमनाथ यांच्या भावाने त्यांना झालेले अटक ते अंत्यसंस्कार इथपर्यंत काय काय झालं? पोलिसांनी कशी आडकाठी केली याचा पाढाच पवारांना वाचून दाखवला. शिवाय मुख्यमंत्र्यांनी जे विधानसभेत सांगितलं ते सर्वच्या सर्व चुकीचे होते असेेही तो म्हणाला. यावर शरद पवारांनी सरकारपर्यंत तुमचे म्हणणे पोहचवू असे आश्वासन सुर्यवंशी परिवाराला दिले आहे.

जिल्ह्यात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर परभणीत आंदोलन झाले होते. त्यावेळी काही समाज कंटकांनी तिथे हिंसा देखील केली होती. त्यानंतर पोलिसांनी काँबिंग ऑपरेशन करत सोमनाथ सुर्यवंशी यांना अटक केली होती. अटक केलेल्या 50 जणांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर कारागृहातच सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत हा मृत्यू झाल्याचा आरोप सोमनाथ यांच्या कुटुंबीयांनी केला, या गोष्टीला दुजोरा म्हणुन पोस्टमॉर्टम रिपोर्ट देखील समोर आला. याच सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे व देशाचे वरिष्ठ नेते शरद पवारांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी सोमनाथ यांच्या भावानेच त्यांच्यासोबत काय काय झाले याचा पाढाच शरद पवारांपुढे वाचला.

सोमनाथ यांच्या भावाने सांगितले की, पोलिसांनी सोमनाथला अटक केली. त्यानंतर काही दिवसांनी पोलिसांचाल आम्हाला फोन आला. त्यात सांगितले गेले की सोमनाथला हार्ट अटॅक आला आहे. त्याचा मृतदेह घेवून जा. मात्र त्यानंतर मृतदेह छत्रपती संभाजीनगरला न्या, पुण्याला न्या अशा पद्धतीने पोलिसांकडून सांगण्यात येत होते. याशिवाय एकदा आयजीं बरोबर बोलून घ्या असेही सांगितले गेले. आयजीं बरोबर बोलताना त्यांनी सोमनाथला दारूचं व्यसन होतं का? सिगारेटचं व्यसन होतं का? अशी विचारणा केली. त्यानंतर त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचे आम्हाला सांगितले. नेमका त्याच काळात शवविच्छेदनाचा रिपोर्ट समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता.

आम्हाला माझ्या भावाचा मृतदेह परभणीला नेण्यापासून रोखण्यात आले. जिथे त्याचा मृत्यू झाला तिथेच आम्ही अंत्यसंस्कार करणार असे कुटुंबीयांनी सांगितले होते. त्यावेळ अँब्यूलन्सच्या ड्रायव्हरलाही पोलिसांनी तेथून पळवून लावले. आम्ही परभणीला येण्यावर ठाम होतो. त्याच वेळी तिथे एक आयपीएस अधिकारी आले. ते आईला म्हणाले परभणीला बरेच लोक जमले आहेत. तिथे राडा झाला तर त्याची जबाबदारी तुम्ही घेणार का? त्यावर आईने संगितले, माझ्या मुलाला अटक केल्यानंतर तुम्ही कसलीही माहिती दिली नाही? माझ्या मुलाला ठार मारलं गेलं, त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का? असा प्रतिप्रश्नही विचारला गेला. त्यावर ते अधिकारी काहीच बोलले नाहीत. त्यानंतर आम्ही परभणीत आलो असेही त्यांनी पवारांना सांगितले.

भावानंतर सोमनाथ यांच्या आईने देखील आपले म्हणणे शरद पवारांसमोर मांडले. माझ्या मुलाचा मर्डर केला गेलाय. चार दिवस त्याला कोठडीत ठेवलं. तिथं त्याला मारहाण झाली. पोलिसांनी आपल्याला काही कळवलं नाही. आम्हाला बोलावलं असतं तर आम्ही त्याला समजवून सांगितलं असतं. पण पोलिसांनी त्याला मारहाण करून त्याचा जीव घेतला. माझ्या मुलाचा जीव गेला त्यावेळी जे जे पोलिस ड्युटीवर होते त्या सगळ्यांना फाशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी पवारांसमोर केली. पोलिसांनी सोमनाथचा मोबाईल जप्त केला. ते सर्व डेटा डिलिट करतील अशी शंका व भिती त्यांच्या भावाने व्यक्त केली. दरम्यान सोमनाथ जर हिंसक आंदोलन करत होता, तर त्याचे व्हिडीओ पोलिसांनी सार्वजनिक करावेत अशी मागणी ही कुटुंबीयांनी केली आहे. याशिवाय पोलिस स्टेशन मधील व्हिडीओ देखील सार्वजनिक करावे अशी मागणी केलीय. सोमनाथची परिक्षा होती. त्यामुळे तो सोडण्याची विनंती करत होता पण तसे झाले नाही असेही त्यांनी सांगितले.

यादरम्यान शरद पवारांनी सुर्यवंशी कुटुंबीयांचे म्हणणे शांतपणे व व्यवस्तितपण ऐकून घेतले. जी घटना घडली ती अतिशय धक्कादायक असल्याचे ते म्हणाले. त्यावेळी जनतेमध्ये रोष होता. त्याची प्रतिक्रीया उमटली. त्यातून निदर्शने झाली. त्यांच्यावर सक्ती करणे चुकीचे होते. आंदोलनकर्त्यांना मारहाण करणे योग्य नव्हते. त्यानंतर कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले. सरकार आता उत्तर देत आहे. पण ते न पटणारं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सुर्यवंशी कुटुंबाला भेटणे गरजेचे आहे. त्यांची बाजू ऐकणे गरजेचे आहे. तुमच्यावर अन्याय होणार नाही. तुम्हाला न्याय नक्की मिळेल याची काळजी आम्ही घेवू असे म्हणत शरद पवारांनी यावेळी आश्वासन दिले. तुमच्या घरातला कर्ता मुलगा गेला आहे. ते दुख: पचवण्याची ताकद तुम्हाला मिळो असेही पवार यानेळी म्हणाले

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img