राज्यात मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर काल रात्री खाते वाटपदेखील जाहिर करण्यात आले आहे. दरम्यान सिन्नर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषीमंत्री पदाचा भार दिलेला आहे. मंत्री झाल्यानंतर माणिकराव ठाकरे हे पहिल्यांदाच नाशिकमध्ये (Nashik) दाखल झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांकडून नाशिकमध्ये मोठ्याप्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली. आता हीच बॅनरबाजी मात्र चर्चेचा विषय झालेली दिसत आहे. याचे कारण म्हणजे माणिकराव कोकाटे यांच्या स्वागताच्या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा फोटो लावण्यात आलेला नाही. मात्र छगन भुजबळांचे कट्टर विरोधक असलेल्या आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांचा फोटो बॅनरवर लावण्यात आल्याने आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा शपथविधी (Mahayuti Cabinet Expansion) समारंभ रविवारी दि. 15 डिसेंबर रोजी पार पडला. यात 33 कॅबिनेट व 6 राज्यमंत्र्यांचा समावेश केला गेला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना बाजूला केल्याने ते कमालीचे नाराज झालेले उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. छगन भुजबळ यांना डावलून त्यांच्या जागी माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. अशातच नाशिकमध्ये लागलेल्या या बॅनर्सने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
मंत्रिपद मिळाल्यानंतर माणिकराव कोकाटे हे पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शहरात समर्थकांकडून मोठ्याप्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली बघायला मिळत आहे. माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानाबाहेर लावलेल्या बॅनरवर मात्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा फोटो नसल्याचे पाहायला मिळाले आहे. दुसरीकडे छगन भुजबळ यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या सुहास कांदेंचा फोटो मात्र बॅनरवर झळकत आहे. अशातच माणिकराव कोकाटे आणि छगन भुजबळ यांच्यातील संघर्ष मात्र या बॅनरबाजीमुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.
या बॅनरबाजीबाबत कोकाटे यांना विचारल्यावर ते म्हणाले की, माझे आणि त्यांचे काही मतभेद असतील मात्र आमच्यात वैर नाही. जे बॅनर लावले आहेत ते कार्यकर्त्यांनी लावले आहेत. त्यांनी कोणाचे फोटो टाकायचे आणि कुणाचे नाही टाकायचे हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी मला विचारून बॅनर लावलेले नाही. मला विचारले असते तर मी त्यांना सांगितले असते भुजबळांचा फोटो टाका, असे म्हणत माणिकराव कोकाटेंनी भुजबळांसोबत असलेल्या त्यांच्या वादावर पडदा टाकण्याचे काम केले आहे. मात्र भुजबळांचे विरोधक म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या सुहास कांदे यांचा फोटो बॅनरवर आहे, याबाबत विचारल्यावर मला माहित नाही बॅनर कोणी लावलेले आहे. कार्यकर्त्यांना जे योग्य वाटते ते कार्यकर्ते करतात, अशी प्रतिक्रिया माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांना दिली