गॅरी जेनकिन्स यांनी दिग्दर्शित केलेल्या लायन किंग फिल्म युनिव्हर्सचा प्रीक्वल असलेला ‘मुफासा: द लायन किंग’ (Mufasa : The Lion King ) हा चित्रपट ‘वनवास’ सोबत 20 डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. मुफासाची ही गोष्ट आता प्रेक्षकांच्याही पसंतीस येत असल्याचं चित्र सध्या बॉक्स ऑफिसवर पहायला मिळत आहे. त्यामुळेच पुष्पा 2 (Pushpa 2) आणि वनवास सारखे साऊथ आणि बॉलिवूड चित्रपट असूनही पहिल्याच दिवशी या चित्रपटाने चांगली सुरुवात केल्याचं बघायला मिळालय.
या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशीच्या कमाईशी संबंधित काही आकडेही समोर आले आहेत. या आकड्यांवरुन असा अंदाज बांधला जातोय की हा सिनेमा भारतात चांगली कमाई करेल असं चित्र सध्या तरी दिसत आहे. Sacknilk च्या माहितीनुसार, मुफासाने भारतात पहिल्याच दिवशी इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये 8.8 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी रात्री 10.15 वाजेपर्यंत चित्रपटाने 13.54 कोटी इतकी कमाई केली होती. चित्रपटाचे आतापर्यंतचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 22.34 कोटी रुपये झाले असल्याचे समोर आले आहे.
अनिल शर्मा ज्यांनी गदर व गदर 2 चे दिग्दर्शन केले होते त्यांनीच नाना पाटेकर आणि उत्कर्ष शर्मा यांच्यासोबत वनवास बनवला आहे, जो हॉलिवूडच्या मुफासाबरोबरच प्रदर्शित झाला होता. वनवासची पहिल्या दिवसाची कमाई म्हणजेच ओपनिंग फक्त 60 लाख रुपये होती आणि दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने जेमतेम 1 कोटींचीच कमाई केली आहे. मात्र हॉलिवूड चित्रपट ‘मुफासा’ने यापेक्षा अधिक कमाई केली आहे. वनवास ऐवजी पुष्पा 2 ने 1000 कोटींचा टप्पा ओलांडला आहे आणि अजूनही हा चित्रपट सिनेमागृहांत आहे. दाक्षिणात्य ब्लॉकबस्टर समोर असतानाही मुफासाच्या कमाईत कोणतीही प्रकारची घट झालेली दिसत नाही. दोघांची रोजची कमाई जवळपास सारखीच आहे.
मुफासा : द लायन किंग या चित्रपटात शाहरुख खान आणि त्याच्या दोन्ही मुलांनी म्हणजेच अबराम खान आणि आर्यन खान यांनी चित्रपटातील महत्त्वाच्या पात्रांना आपला आवाज दिला आहे. शाहरुखने मुफासाला तर अबराम खानने लहान असलेल्या मुफासाला आपला आवाज दिलेेला आहे. मुफासाचा मुलगा असलेल्या सिम्बाला शाहरुखचा मोठा मुलगा आर्यनने आवाज दिला आहे. त्यामुळे देखील हा चित्रपट भारतीय प्रेक्षकांसाठी व त्यातही शाहरुखच्या चाहत्यांसाठी महत्वाचा ठरत आहे. यासोबतच मराठी अभिनेता श्रेयश तळपदे व संजय मिश्रा यांनीही चित्रपटातील टिमोन आणि पुंबा या विनोदी पात्रांना आपला आवाज देत चित्रपटात जादू निर्माण केली आहे.