बीड जिल्ह्यामधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा अत्यंत निकटवर्तीय वाल्मिक कराडचे नाव आल्यानंतर आरोपांच्या फैरी उडताना दिसत आहेत. वाल्मिक कराडवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन सादर करत कोणालाही सोडणार नसल्याचे म्हंटले आहे. यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्हा पोलिस अधीक्षकांची सुद्धा उचलबांगडी केली आहे. वाल्मिक कराडवर अजूनही कारवाई झाली नसल्याने बीड जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. याच दरम्यान आमदार संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी केली आहे.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वाल्मिक कराडवरून सरकारवर गंभीर आरोप केला आहेत. वाल्मिक कराड नागपुरात फार्म हाऊसवर आहे, मी पत्ता देतो पोलीस त्याला पकडत नसल्याचे अंबादास दानवे यांनी म्हंटले आहे. दरम्यान, याच मुद्याला पुढे रेटत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता थेट प्रश्न केला आहे. फडणवीस तुम्ही म्हणता वाल्मिक कराड गायब आहे, मग हे काय? अशी विचारणा त्यांनी एक्सवर पोस्ट करत केली आहे. अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडला तातडीने अटक झालीच पाहिजे, अशी मागणी केली आहे. सोबतच अटक नाही झाली तर आम्ही सगळे बीडला जाऊन आंदोलन करणार, असा इशाराही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. धनंजय मुंडे यांना देखील कुठलेही खाते मिळता कामा नये, अशी मागणी ट्विट करून दमानिया यांनी केली आहे.
Dhananjay Munde : ‘धनंजय मुंडे हे कुठे लपून बसलेत?’भाजप आ.सुरेश धस यांचा सवाल
विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, हत्या अतिशय क्रूरपणे झाली असून त्यांच्या डोळ्यांना चांगलाच मार बसला होता. वाल्मिक कराडचे खंडणी प्रकरणातील आरोपींबरोबर असलेल्या संभाषणाचे व अन्य पुरावे पाहता गुन्ह्यात सहभाग आहे. याच वाल्मिक कराडचा देशमुख हत्येतही सहभाग असल्याचे एसआयटी चौकशीत दिसून आले, तर त्याचे सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातील कोणत्याही राजकीय नेत्याबरोबर संबंध असले, तरी त्याचा मुलाहिजा न बाळगता ‘मोक्का’ नुसार कारवाई केली जाईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. परंतु कराड याचे राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंध असल्याचा आणि सरकार आपल्या मंत्र्यांना वाचवत असल्याचा आरोप करीत विरोधकांनी आज सभात्याग केला.