ठाणे जिल्ह्याच्या कल्याणमधील हायप्रोफाईल सोसायटीमध्ये धूप लावण्याच्या वादातून तीन जणांना बेदम मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अखिलेश शुक्ला या व्यक्तीने ही मारहाण केली होती. परप्रांतीय व्यक्तीने मुजोरी करत मराठी माणसाला मारहाण केल्याने याचे पडसाद आता सर्वत्र उमटत असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणाची दखल घेत विधानपरिषदेत आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली आहे. तसेच आरोपी अखिलेश शुक्लाचे निलंबन केल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलीय.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषेदेत या प्रकरणारवर म्हटले की, “अखिलेश शुक्ला आणि त्याच्या पत्नीने मराठी माणसाला अपमानित होईल असे उद्गार काढले. यातून एक संतापाची लाट मराठी माणसामध्ये तयार झाली आहे. अखिलेश शुक्ला हा MTDC चा कर्मचारी आहे. याप्रकरणी पत्नीसह त्याच्यावर खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंद झाला आहे. त्याचे तत्काळ निलंबन देखील करण्याची कारवाई करण्यात आली आहे.”
“मुंबई आणि महाराष्ट्र मराठी माणसाचाच होता, मराठी माणसाच आहे , मराठी माणसाचाच राहील. कधी-कधी काही नमुने चुकीचे वक्तव्य करतात माज आल्यासारखे करतात. अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही”, असा इशारा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
Santosh Deshmukh Murder Case : ‘दोषींवर मोक्का कायदा लावणार’; मुख्यमंत्र्यांची घोषणा
“भाजपचे सरकार आले म्हणून हे झाले अशाप्रकराचे राजकीय रंग देण्याचे कारण नव्हते. कारण आपण राजकाणात शिरलो तर मुंबईतील मराठी माणूस हद्दपार का झाला? कुणाच्या काळात झाला? मराठी माणसाला मुंबईतून ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई-विरार आणि त्याच्या पलिकडे का जावे लागले?”, असा सवाल फडणवीसांना विरोधकांना विचारला.
“काही लोक माजोरड्यापणाने बोलतात. त्यामुळे मुंबईच्या सोशल फॅब्रिकला गालबोट लागले. मात्र मी ठणकावून सांगतो कुठल्याही मराठी माणसावर येथे अन्याय होऊ देणार नाही. प्रत्येकाला काय खायचे याचा अधिकार आणि स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे. मात्र शाखाहारी-मासांहारी भेदभाव करणे मान्य करता येणार नाही. अशा प्रकारच्या तक्रारी आल्यातर योग्य कारवाई केली जाईल. आम्ही मराठी आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. त्यावर कुणी घाला घालत असेल तर त्यांच्यावर निश्चित कडक कारवाई केली जाईल”, असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.