-1.7 C
New York

Oscar 2025 : ऑस्करच्या शर्यतीतून ‘लेडीज’ झाल्या ‘लापता’

Published:

दिग्दर्शिका व निर्माती किरण रावचा (Kiran Rao) ‘लापता लेडीज’ (Laapataa Ladies) हा सिनेमा भारताकडून अधिकृतरित्या ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता. परंतु ऑस्कर पुरस्कारांमध्ये पहिल्याच फेरीतून हा सिनेमा बाहेर पडल्याची धक्कादायक माहिती काल समोर आली आहे. त्यानंतर काल लगेचच दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta ) यांनी फिल्म फेड्रेशनच्या (FFI) निवडीवर तीव्र नाराजी व्यक्त करणारी एक पोस्ट केली आहे. लापता लेडीजची निवड झाली त्याचवेळी अनेकांनी ही निवड चुकली असल्याचे मत व्यक्त केले होते. तरी आता ऑस्करच्या शर्यतीच्या पहिल्याच फेरीतून हा सिनेमा बाहेर फेकला गेला आहे.

दिग्दर्शक हंसल मेहता यांनी एक्स हँडलवर पोस्ट करत फिल्म फेड्रेशनवर ही नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे ऑस्करसाठी भारताची निवड खरंच चुकली का असा प्रश्न आता पुन्हा एकदा उपस्थित केला जातोय. विशेष म्हणजे इंग्लंडकडून ऑस्करसाठी पाठवण्यात आलेल्या ‘संतोष’ (Santosh) या हिंदी सिनेमाला ऑस्करमध्ये नामांकन मिळाले आहे.

हंसल मेहता यांनी पोस्ट करत म्हटले की, फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने पुन्हा तेच केले. त्यांचा स्ट्राइक रेट आणि वर्षानुवर्षे चित्रपटांची निवड ही चुकीची आहे. हंसल मेहता यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांच्या या मताशी सहमती दर्शवली आहे. दरम्यान ऑस्करसाठी भारताकडून पायल कपाडियाच्या ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाईट’ या सिनेमाची निवड व्हायला हवी होती, असेही अनेकांचे मत आहे.
अॅकडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सने बुधवारी, 18 डिसेंबर रोजी ऑस्कर 2025 च्या शर्यतीतील चित्रपटांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये 10 विविध विभागांमध्ये नॉमिनेश मिळाले आहे. पण यादीमध्ये भारताच्या लापता लेडीज सिनेमाचे नाव नाही. त्यामुळे लापता लेडीज सिनेमा ऑस्करच्या शर्यतीमधून बाहेर पडल्याचे स्पष्ट झाले. पण यामध्ये युनाटेड किंगडम देशाकडून पाठवण्यात आलेला संतोष हा हिंदी भाषेतील सिनेमा ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म’साठी निवडण्यात आला आहे.

याआधी अभिनेता आणि दिग्दर्शक अमिर खान याने ”लापता लेडीज’ने यावर्षी ऑस्कर पुरस्कारांच्या शॉर्टलिस्टमध्ये गेला नाही. यामुळे आम्ही निराश झालो आहोत, परंतु, या प्रवासात आम्हाला मिळालेल्या प्रचंड पाठिंब्याबद्दल आणि विश्वासाबद्दल आम्ही आभारी आहोत. अकादमी सदस्य आणि एफएफआय ज्युरींचे आभार मानतो. या प्रतिष्ठित कार्यक्रमात सामील होणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. हा चित्रपट जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या बरोबरीने ठेवण्यात आला होता.”अशी प्रतिक्रिया दिली आणि त्यानंतर ‘आमच्यासाठी हा शेवट नाही उलट पुढे जाण्यासाठीचं आणखी एक पाऊल आहे. आम्ही जगासमोर आणखी दमदार गोष्टी घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करु.” असं दिग्दर्शिका व निर्माती किरण राव म्हणाली.

Academy of Motion Picture Arts and Sciences या संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय पातळीवर दिल्या जाणाऱ्या पुरस्काराला ‘ऑस्कर पुरस्कार’म्हणतात.१९२९ साली पहिल्यांदा अकादमी पुरस्कार देण्यास सुरुवात केली. भारतात वर्षभरात हजारो सिनेमे वेगवेगळ्या भाषांमध्ये बनतात, जगभरात तर असे लाखो सिनेमे रिलीज होतात.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img