जगातील महासत्ता म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेमधील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या व्याज दर कपातीसंदर्भातील निर्णयानंतर अमेरिकेतली शेअर बाजारात देखील घसरण पाहायला मिळाली. पर्यायाने याचा परिणाम भारतीय शेअर मार्केटवर देखील झाला आणि जगभरातील शेअर बाजार गडगडले. चलनावर देखील त्याचा परिणाम पाहायला मिळालेेेला आहे. आता डॉलर्सच्या तुलनेत रुपया निचांकी पातळीवर पोहोचला असल्याचे समजले आहे. भारताला एका अमेरीकी डॉलरसाठी 85.06 रुपये मोजावे लागतील. अमेरिकेची सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हने 2025 मध्ये महागाई दराचा अंदाज वाढवला आहे. तर, व्याज दरात केवळ दोन वेळा कपात करण्याचे सूचकदेखील त्यांनी दिले आहेत, त्यामुळे रुपयावर दबाव पाहायला मिळाला.
करन्सी मार्केटमध्ये डॉलरच्या तुलनेत रुपया 85.04 रुपयांवर होता. त्यानंतर तो घसरुन 85.07 रुपयांपर्यंत पोहचला. गेल्या सत्रात रुपया 84.96 रुपयांवर बंद झाला होता. पहिल्यांदाच रुपया 85 रुपयांच्यावर पोहोचला आहे. आयातदारांकडून मागणी वाढल्याने आणि शेर बाजारात शेअर्सची विक्री करुन विदेशी गुंतवणूकदार त्यांचे पैसे काढून घेत असल्याचे समोर आले आहे, त्यामुळं डॉलर्सची मागणी वाढून रुपया कमजोर होताना पाहायला मिळाला आहे.
अमेरिकन फेडरल बँकेने दोन दिवसांच्या बैठकीनंतर 18 डिसेंबरला आपले धोरण जाहीर केले. ज्यामध्ये व्याजदरांमध्ये 0.25 टक्के कपात केली. मात्र 2025 मध्ये महागाईचा दर 2.1 टक्क्यांवरुन 2.5 टक्के केला आहे. फेडरल रिझर्व्हने 2025 मध्ये केवळ दोनवेळा व्याज कपात केली जाईल असे म्हटले आहे. याआधी फेडरल रिझर्व्ह एका वर्षात 4 वेळा व्याज कपात जाहीर करत होती. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये निराशा आहे. फेडरलच्या याच निर्णयानंतर डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाला.
याच वर्षी नोव्हेंबरमधील भारताचा व्यापारातील तोटा हा निचांकी पातळीवर पोहोचलेला पहायला मिळाला. नोव्हेंबर 2024 मध्ये व्यापारातील तोटा मागील सर्व रेकॉर्ड मोडत 37.84 अब्ज डॉलर्सवर पोहोचला. पुढच्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात डोनाल्ड ट्र्म्प अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारणार आहेत. ट्रम्प यांच्या विजयानंतर देखील भारताचा रुपया घसरत चालला आहे असे दिसतेय. यासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर डॉलर मजबूत झाला आणि इतर चलने कमजोर झाली.
भारतीय शेअर बाजारात आज 1000 अंकांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. शेअर बाजारातील बीएसई (BSE) आणि एनएसईवरील (NSE) बहुतांश कंपन्यांच्या शेअरमध्ये आज घसरण झाली. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराचे बाजारमूल्य 449 लाख कोटी रुपयांवर आले. परिणामी गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी रुपयांचे नुकसान सकाळच्या सत्रात झाले.