महायुतीच्या तीन प्रमुख नेत्यांनी 5डिसेंबर रोजी शपथ घेतल्यानंतर आता जवळपास आठ दिवसांनी मंत्रिमंडळ विस्ताराला वेग आला आहे. हा मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी पुढील 24 तासांत होण्याची शक्यता आहे वर्तवली जात आहे. अशातच महायुतीतील भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना किती आणि कुठली खाती मिळणार याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. या तीनही पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांची यादीही दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. पण अशातच आता युवासेनेचे प्रमुख व वरळी मतदार संघाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी केली असल्याचे समजले आहे.
माजी मंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शनिवार दि.13 डिसेंबरला पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मुंबईतील रस्ता घोटाळ्याकडे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस ( CM Devendra Fadnavis) यांना स्वच्छ सरकार चालवण्याची मोठी संधी आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे, दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवा, अशी मागणीदेखील केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकेर) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) त्यांचं उशिरा का होईना पण अभिनंदन केले होते. याशिवाय आदित्य ठाकरेंनीही विधानभवन परिसरात फडणवीसांना शुभेच्छा दिल्या होत्या. यातच आता आदित्य ठाकरेंनी मुंबईतील रस्ता घोटाळ्यावरुन एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलं आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून आपण मुंबईतील रस्ते घोटाळ्यासंदर्भात आवाज उठवत आहोत. जवळपास 6 हजार कोटींचा घोटाळा लोकांसमोर आणला होता. पण मुंबई महापालिकेलादेखील मान्य करावे लागले आणि 6 हजार कोटींवरून हा घोटाळा 5 कोटींवर आला.या घोटाळ्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा यांचा काही सहभाग आहे का? हे मला माहिती नाही. केसरकर, लोढा यांचा यात काही हात आहे का? याचं उत्तर सरकारकडून आलेलं नाही, असंही आदित्य ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
याचबरोबर मुंबईतील रस्ता घोटाळ्यात एसआयटी चौकशी लावावी अशी मागणी आता भाजपकडून होत आहे. खोके सरकारच्या रस्ते घोटाळ्याची चौकशी करा, हेच मीही गेल्या दोन वर्षांपासून सांगत होतो. आपण हे घोटाळे लोकांसमोर आणले, त्यानंतर आता मुंबईतील भाजप बोलायला लागली, असं आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितले.
Weather Update: थंडीचा तडाका कायम राहणार, हवामान विभागाची माहिती
भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता स्वच्छ सरकार चालवण्याची संधी आहे. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे, दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांना रस्ता घोटाळ्याची एसआयटी चौकशी होईपर्यंत आणि त्यांचा या रस्ते घोटाळ्यात काहीही संबंध नाही हे सिद्ध होत नाही, तोपर्यंत या तिघांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवावं. तेव्हाच हे सरकार वॉशिंग मशीनचं सरकार नसल्याचं आम्ही समजू, असही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
आदित्य ठाकरे यांनी दादरमधील हनुमान मंदिर हटवण्याच्या निर्णयाला रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या स्थगितीवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ही स्थगिती घाईने दिलेली आहे. यावरून भाजपचं हिंदुत्व हे नकली असल्याचं व निवडणुकीपुरतंच असल्याचं दिसून येत आहे. निवडणुकीवेळी हिंदुंना पुढे केलं जातं. पण निवडणुका झाल्या की, हिंदूच सुरक्षित नसतात, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी पत्रकारांशी बेलताना केली.