राज्यात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर जवळपास बारा दिवसांनी मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथ विधी सोहळा पार पडला होता. आता मंत्रिमंडळ विस्ताराला लागलेल्या वेळेवर राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चा होत आहे. अशातच महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकादेखील होत आहेत.आता माध्यमांद्वारे अशा बातम्या येत आहेत की उद्या म्हणजेच 14 डिसेंबर रोजी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेऊन आता सात दिवसांचा काळ गेला आहे. त्यानंतरही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नसल्याने चर्चांना उधाण आले आहे. नागपूरमध्ये 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन होत असतानाच या अधिवेशनापूर्वी हा विस्तार केला जाईल, याचे सुतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्यात त्याबाबत भाजपाच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा देखील केली असल्याची माहिती दिली आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या शिवसेनेच्या कोणत्या आमदारांना मंत्रिपदाची संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. माध्यमांद्वारे समोर आलेल्या माहितीनुसार शिंदेंच्या सेनेच्या मंत्रिमंडळातील 4 जणांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात संधी मिळणार नाही. यात दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि संजय राठोड या चार मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपने या 4 आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश करु नये असा आग्रह धरला होता. आता भाजपचा हा आग्रह एकनाथ शिंदे यांनी मान्य केलाय, अशी माहितीदेखील चर्चेत आहे.
शिंदेंच्या शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांमध्ये उदय सामंत, शंभूराजे देसाई, गुलाबराव पाटील आणि दादा भुसे या चार आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. एकनाथ शिंदे यांच्याच ठाणे शहरातील आणखी एक आमदार प्रताप सरनाईक यांनाही यंदा मंत्रिपद मिळू शकतं, अशी महािती सुत्रांकडून मिळालीय. याशिवाय मंत्रिपदासाठी गेल्या अडीच वर्षांपासून प्रयत्न करणाऱ्या संजय शिरसाठ आणि भरत गोगावले यांचेही नाव संभाव्य मंत्रिपदाच्या यादीमध्ये आहे, असे म्हटलं जातयं. त्याचबरोबर आशिष जयस्वाल, योगेश कदम, विजय शिवतारे यांचाही मंत्रिमंडळातील प्रवेश नक्की मानला जातोय. कोल्हापूरमधील शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर आणि राजेंद्र याड्रावकर यांच्यापैकी एकाचा मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेनेनंतर भाजप मध्ये चंद्रशेखर बावनकुळे,चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीज महाजन, रविंद्र चव्हाण, प्रविण दरेकर, मंगलप्रभात लोढा, बबनराव लोणीकर, पंकजा मुंडे, आशिष शेलार, योगेश सागर यांना देखील मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे तर शिवेंद्रराजे भोसले, निलेश राणे, विजयकुमार गावित, संभाजी निलंगेकर, जयकुमार रावल, देवयानी फरांदे,राहुल कुल, गोपीचंद पडळकर, संजय कुटे या नेत्यांना भाजपकडून संधी मिळण्याची शक्यता आहे. महायुतीतील तिसरा पक्ष म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी. लोकसभेनंतर विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला कमी जागा मिळाल्या त्यामुळे यंदा मंत्रिमंडळ विस्तारात देखील कमी मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, अनिल पाटील, माणिकराव कोकाटे, इंद्रनिल नाईक, संजय बनसोडे, दत्ता भरणे, संग्राम जगताप, राजू नवघरे या राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावे मंत्रिमंडळाच्या यादीत आहे. त्यामुळे कोणती खाती कोणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.