नवनीत बऱ्हाटे, दि. १३.१२.२०२४
उल्हासनगर : ठाणे पोलीस आयुक्तालयातील उल्हासनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले विष्णू नाथा ताम्हाणे यांनी आंतरराष्ट्रीय ‘आयर्न मॅन’ स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव जागतिक स्तरावर उंचावले आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील बस्लटन येथे आयोजित या स्पर्धेत विष्णू ताम्हाणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सहभाग घेत जगभरातून आलेल्या १७०० स्पर्धकांमध्ये आपले स्थान निर्माण केले.
ऑस्ट्रेलियातील ‘आयर्न मॅन’ स्पर्धा म्हणजे केवळ एक शारीरिक चाचणी नसून ती मानसिक खंबीरतेचा आणि जिद्दीचा सर्वोत्तम नमुना मानली जाते. विष्णू ताम्हाणे यांनी ३.८ किमी जलतरण, १८० किमी सायकलिंग, आणि ४२.२ किमी मॅरेथॉन धावणे अशा कठीण टप्प्यांतून मार्गक्रमण करत सलग १७ तासांच्या आत ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. ‘आयर्न मॅन’ स्पर्धेत जगभरातून १७०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता, त्यापैकी केवळ ११०० स्पर्धकांनी ही स्पर्धा पूर्ण केली. महाराष्ट्रातील पोलीस दलातील अधिकाऱ्यांसह विष्णू ताम्हाणे, विजय अनपट आणि संदीप पाचपुते यांनी या आव्हानात्मक स्पर्धेत भाग घेतला. ताम्हाणे यांच्या सोबत त्यांचा १८ वर्षीय मुलगा गौरंग ताम्हाणे यानेही या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता, मात्र प्रतिकूल हवामानामुळे त्याला स्पर्धा अर्धवट सोडावी लागली.
विष्णू ताम्हाणे यांना स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंगसाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. स्विमिंगसाठी संजीवन वालावलकर, सायकलिंग आणि धावण्यासाठी चैतन्य वेल्हाळ, तर स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी विजय गायकवाड यांनी त्यांना तयार केले. त्याशिवाय त्यांच्या कुटुंबीयांचा आणि पोलीस दलातील सहकाऱ्यांचा मोलाचा पाठिंबा मिळाला. विष्णू ताम्हाणे यांना सातत्याने प्रोत्साहन देणारे आणि स्पर्धेसाठी परवानगी देणारे ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, उल्हासनगर परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे आणि त्यांचे सहकारी यांचे योगदानही या यशामागे महत्त्वाचे ठरले.
‘आयर्न मॅन’ स्पर्धेत अनेक शारीरिक आणि मानसिक आव्हानांचा सामना करावा लागतो. थंडी, वारा, पाऊस अशा प्रतिकूल हवामानातही स्पर्धक आपली कामगिरी बजावतात. स्पर्धेचे ब्रीदवाक्य “Everything is Possible” या प्रेरणेने विष्णू ताम्हाणे यांनी आपल्या ५६ व्या वर्षी हे धाडस दाखवले. ताम्हाणे म्हणाले, “ही कामगिरी माझ्यासाठी वैयक्तिक अभिमानाची बाब असून, माझ्या पोलीस दलातील सहकाऱ्यांच्या आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे ही शक्य झाली आहे. हे यश पोलीस दलासाठीही प्रेरणादायी आहे.”
पुण्यात कार्यरत असताना विष्णू ताम्हाणे यांनी पोलीस दलात मॅरेथॉन आणि सायकल पेट्रोलिंगसारख्या अभिनव उपक्रमांचा प्रारंभ केला होता. या उपक्रमांनी पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना तंदुरुस्तीबाबत जागरूक केले. आयर्न मॅन स्पर्धेतील त्यांची कामगिरी ही नव्या पिढीच्या पोलीस अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. ताम्हाणे यांची आणि त्यांच्या सहकाऱ्यांची ही कामगिरी संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. पोलीस दलातील इतर कर्मचारी आणि नागरीकांमध्ये शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीबाबत जागृती निर्माण करण्याचे त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक व स्पर्धेचे विजेते विष्णू ताम्हाणे यांची प्रतिक्रिया :
“आयर्न मॅन स्पर्धा पूर्ण करणे हे केवळ माझ्या वैयक्तिक क्षमतेचे यश नाही, तर माझ्या सहकाऱ्यांचे प्रोत्साहन, कुटुंबीयांचा पाठिंबा आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन यांचे फलित आहे. या स्पर्धेतून मला हे शिकायला मिळाले की धैर्य, संयम, शिस्त आणि चिकाटी यांच्या जोरावर कोणतेही अशक्य वाटणारे ध्येय गाठता येते. आयर्न मॅन स्पर्धेचे ब्रीदवाक्य ‘एव्हरीथिंग इज पॉसिबल’ हे प्रत्येकाला सांगते की वय, परिस्थिती किंवा आव्हाने यांना बाजूला ठेवून आपण आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवला पाहिजे. या यशातून माझे पोलीस दलातील सहकारी, समाजातील तरुण, आणि मुलांना नवी प्रेरणा मिळेल, अशी माझी आशा आहे. पोलीस दलाच्या तंदुरुस्तीविषयीची भावना अजून बळकट होण्यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त ठरतील, याचा मला विश्वास आहे.”