ओतूर,प्रतिनिधी:दि.१० डिसेंबर ( रमेश तांबे )
ओतूर ( ता.जुन्नर ) येथील बाबीतमळा येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्याची मादी जेरबंद करण्यात आली असल्याची माहिती ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांनी दिली.बाबीतमळा परिसरात बिबट्याचा वावर असल्याने, या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी येथील नागरिकांनी केली होती. त्यानुसार ओतूर वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावला होता. मंगळवारी दि.१० रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास बिबट्याची मादी जेरबंद झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी ओतूर वनविभागाला दिली. त्यानुसार
ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूरच्या वनपाल सारिका बुट्टे,वनरक्षक विश्वनाथ बेले,वनरक्षक दादाभाऊ साबळे, वनमजूर किसन केदार, गणपत केदार, फुलचंद खंडागळे,गंगाराम जाधव, प्रदीप तांबे हे सदर ठिकाणी तात्काळ पोहोचून पाहणी करून सदर बिबट्याला ताब्यात घेऊन माणिकडोह बिबट निवारा केंद्र, येथे दाखल केले. सदर कामी बाबीतमळा ग्रामस्थ गणेश गीते, कुणाल गीते,अभिषेक गीते,रजत गीते, तुकाराम गीते,राजू कोळपे यांनी सहकार्य केले.
सदर बिबट्याच्या मादीचे वय चार ते पाच वर्षे असल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले.
बिबट प्रवण क्षेत्रातून आपली वाहने चालवीत असताना, आपल्या वाहनाचे हॉर्न मोठाने वाजवावे जेणेकरून रस्त्याच्या बाजूच्या बाजूला दबा धरून बसलेले वन्य प्राणी त्यांची जागा बदलतील किंवा ते बाजूला सरकतील व तसेच आपले गुरे चारित असताना किंवा शेतीचे कामे करित असताना, मोठ्याने आवाज करावा किंवा मोबाईल वरती गाणे वाजवणे, रात्री अपरात्री घराच्या बाहेर पडत असताना आपल्या हातात घुंगराची काठी, बॅटरी असावी जेणेकरून वन्य प्राण्यापासून स्वतःचे संरक्षण होईल.