महायुती (Mahayuti) सरकारच्या शपथविधी सोहळ्याला आता केवळ काही तास शिल्लक आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे उपमु्ख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का नाही? हे मात्र गुलदस्त्यात होतं. अखेर सस्पेन्स संपला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे आता एकनाथ शिंदे देखील महायुती सरकारचा भाग असणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले होते, त्यांना अखेर यश मिळालंय.
महाराष्ट्रात आता पुन्हा महायुतीचं सरकार (Maharashtra CM) आलंय. चेहरे सारखेच आहेत, मात्र यावेळी सत्तेची समीकरणे बदलली आहेत. हा बदल मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर दिसणार आहे. महायुती 2.0 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे, अजित पवार उपमुख्यमंत्री भूमिकेत दिसणार आहेत. आम्ही तिघे मिळून सरकार चालवू, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. पद केवळ तांत्रिक आहे, बाकी काहीही बदलणार नाही. म्हणजे यावेळेस केवळ मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बदल होणार आहे. बाकीचे तेच जुने चेहरे सरकारचा भाग राहतील.
महायुतीच्या पहिल्या सरकारमध्ये, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते. तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत होते. बुधवारी सकाळी झालेल्या भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री चेहऱ्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर महायुतीच्या नेत्यांची बैठक होऊन फडणवीस यांच्या नावाने पाठिंब्याचे पत्र तयार करण्यात आलं. शिंदे, पवार आणि फडणवीस यांनी राजभवनात पोहोचून राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्यासमोर सरकार स्थापनेचा दावा केला होता. त्यानंतर तिन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
अनेक विक्रम नोंदवत फडणवीस पवारांच्या रांगेत; ‘मी पुन्हा येईल’ ची Inside Story
काल झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, 2022 मध्ये फडणवीसांनी त्याच जागेवर माझ्या नावाचा (मुख्यमंत्री पदासाठी) प्रस्ताव ठेवला होता. आज त्याच ठिकाणी मी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव देत आहे. मुंबईतील आझाद मैदानावर आज महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत.
शिवसेना आमदारांनी एकनाथ शिंदे यांची केलेली मनधरणी यशस्वी झालीय. एकनाथ शिंदे हे देखील आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासाठी थोड्याच वेळात राजभवनावर पत्र जाणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिपदाचा सस्पेन्स संपला आहे. जर तुम्ही शपथ घेतली नाही, तर आम्ही देखील आमदारकीची शपथ घेणार नाही, असा सूर शिवसेना आमदारांनी धरला होता.