महाराष्ट्राला आज नवा मुख्यमंत्री (Mahayuti CM) मिळणार आहे. महाराष्ट्रात आज म्हणजेच 5 डिसेंबर रोजी नव्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा होत आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. महाराष्ट्रात आज आझाद मैदानावर संध्याकाळी 5.30 वाजता नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं सांगितलं जातंय.
देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या (Maharashtra CM) शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदींसह नऊ केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार आणि योगी आदित्यनाथही सहभागी होणार आहेत. एवढेच नाही तर लाडक्या बहिणी देखील या शपथविधीच्या साक्षीदार होणार आहेत. शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईत पूर्ण तयारी सुरू आहे. पाहुण्यांची यादी तयार असून कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील तिन्ही नेत्यांसोबत खातेवाटपाबाबत बोलणी पूर्ण झालीय.
ठाकरे, पवारांना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण; आझाद मैदानावर जय्यत तयारी
शपथविधी आटोपल्यानंतर आज लगेचच कॅबिनेटची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या संभाव्य तारखा देखील जाहीर झालेल्या आहेत. त्यापूर्वी काही मंत्री शपथ घेणार आहे. विधानभवनामध्ये 7 किंवा 8 तारखेला शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मात्र नागपूर अधिवेशनापूर्वी कॅबिनेट विस्तार होणार असल्याचं सांगितलं जातंय. परंतु महायुतीत मंत्रिपदावरून घोडं अडल्याचं देखील समोर आलंय. त्यामुळे केवळ तीनच नेते आज शपथ घेणार असल्याची माहिती मिळतेय.
आज राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. वरिष्ठ काय निर्णय घेतात याकडे सर्वांचेच लक्ष आहे. महायुतीच्या तीन मोठ्या नेत्यांनी अथवा वरिष्ठांनी काही निर्णय घेतला, तर त्याची वाट पाहू असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी वक्तव्य केलंय. तर आज केवळ तिघांचा शपथविधी होणार आहे. संध्याकाळी कैबिनेट होवून पुढचे निर्णय होतील. नागपूर अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं अनिल पाटील यांनी सांगितलं आहे. आजच्या शपथविधी सोहळ्याला संत महंतांना देखील आमंत्रित करण्यात आलंय.