भाजप विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आज (दि.४) सर्वानुमते निवड झाली. (Mahayuti Oath Ceremony) विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमुखाने निवड केली. यानंतर आता राज्यपालांकडे महायुतीतर्फे सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे. मात्र, अद्याप राज्यपालांकडे कोणत्याही पक्षाने / आघाडीने बहुमताचा दावा करण्यापूर्वीच फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख असलेली आमंत्रण पत्रिका व्हायरल होत आहे. हा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता होईल. उद्याच्या शपथविधी सोहळ्याच्या अधिकृत निमंत्रण पत्रिकेत देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे.
Mahayuti Oath Ceremony व्हायरल होणाऱ्या पत्रिकेत नेमकं काय?
व्हायरल होणाऱ्या पत्रिकेत सर्वात वरच्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख असून, श्री. नरेंद्र मोदी मा. पंतप्रधान यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीसयांचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तसेच उप मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी समारंभ गुरुवार, दिनांक ५ डिसेंबर, २०२४ रोजी सायंकाळी ५-३० वाजता आझाद मैदान, फोर्ट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी आपण कृपया उपस्थित रहावे, ही विनंती. असा उल्लेख करण्यात आला आहे. यावर राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्या नावाचाही उल्लेख आहे.
फडणवीसांच्या नावावर आज शिक्कामोर्तब; एकनाथ शिंदेही घेणार शपथ?
शिवाय उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींसाठी यात काही सूचनाही देण्यात आल्या आहेत. ज्यात (१) ही निमंत्रणपत्रिका केवळ एका व्यक्तीकरिता असून, समारंभस्थळी गेट क्रमांक ७ (महात्मा गांधी मार्ग) येथे प्रवेशासाठी ही निमंत्रणपत्रिका कृपया दाखवावी. सुरक्षेच्या दृष्टीने सायंकाळी ४-३० पर्यंत आसनस्थ होणे अनिवार्य असून, कृपया भ्रमणध्वनी व्यतिरिक्त कोणतीही वस्तू सोबत आणू नये असा उल्लेख आहे.
Mahayuti Oath Ceremony महायुतीचे विधानसभेतील संख्याबळ २३७ वर
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) २३० जागा मिळाल्या आहेत. तसेच इतर ७ आमदारांनी महायुतीला पाठिंबा दिल्याने महायुतीचे विधानसभेतील संख्याबळ २३७ वर पोहोचले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने १३२, शिंदेंची शिवसेना ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ४१ जागांवर विजय मिळवला.