राज्यात महायुतीला बहुमत मिळाले असले तरी आठ दिवस उलटूनही मुख्यमंत्री ठरू शकलेला नाही. तसेच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली असून शिंदे हे गृहमंत्रीपदासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. महायुतीत एकीकडे ‘गृह’कलह निर्माण झाला आहे. वेगवेगळ्या चर्चा सरकार स्थापनेवरून रंगल्या असतानाच, एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मात्र या सर्वच चर्चा आता मागे पडूनमंत्रिपदावर कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरु झाली आहे. भारतीय जनता पक्षाकडून शपथविधीची तयारी सुरु आहे. त्यांच्या विश्रांतीच्या काळात एकनाथ शिंदे यांनीही संभाव्य मंत्र्यांची यादी तयार केली असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे स्वतः उपमुख्यमंत्रीपद घेण्यासाठी तयार आहेत. शिंदेसेनेकडून नव्या जुन्यांचा मेळ भाजपच्या नेतृत्वातील या सरकारमध्ये घातला जात असल्याची चर्चा आहे.
Eknath Shinde मंत्रिपदाचा फॉर्म्यूला
एकनाथ शिंदे यांना गृहखाते हवे असल्याची चर्चा आहे. तर त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी मी उपमुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत नाही, हे स्पष्ट केले आहे. येत्या 5 डिसेंबरला महायुती सरकारचा आझाद मैदानावर शपथविधी सोहळा होणार आहे. महायुतीमध्ये मंत्रिपदाचा फॉर्म्यूला ठरला असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे गटाला 12-13 आणि अजित पवार गटाला आठ ते नऊ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 22-23 मंत्रिपदे मिळू शकतात. यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेतून कोणाला संधी मिळणार आणि कोणाला डावलले जाणार याचीही चर्चा सुरु झाली आहे.
शिंदेंची नाराजी अजित पवारांच्या पथ्यावर? अजित पवारांनी घेतली अमित शाहांची भेट
Eknath Shinde भरत गोगावले, प्रताप सरनाईकांना संधी
मंत्रिपदाच्या वेटिंगलिस्टवर मागील सरकारमध्ये असणारे भरत गोगावले, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, प्रकाश अबिटकर मंत्रीपदाची लॉटरी यांना यावेळी लागण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे हे चार नवे चेहरे मंत्रिमंडळात दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय दादा भासू, शंभुराज देसाई, आणि उदय सामंत यांचे मंत्रिमंडळातील स्थान अबाधित राहण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी 9 जणांना संधी मिळाली होती. यंदा नव्या दमाच्या आमदारांची शिवसेना शिंदे गटातून मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या आमदार भावना गवळी यांचाही यामध्ये समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.