भाजपच्या आमदारांची विधिमंडळ गटनेता निवडीची बैठक सुरु
आता विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या आमदारांची विधिमंडळ गटनेता निवडीची बैठक सुरु झाली आहे. यावेळी गटनेतेपदाचा प्रस्ताव सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील हे मांडणार आहेत. तर आशिष शेलार आणि रविंद्र चव्हाण हे या प्रस्तावावर अनुमोदन देणार आहेत.
भाजपची कोअर कमिटीची बैठक संपली
निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत भाजप कोअर कमिटीची बैठक पार पडली. देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली बैठक
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात सर्वत्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील ७ जिल्ह्यांना ४ ते ७ डिसेंबर या कालावधीत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. फेंगल चक्रीवादळ शांत होत नाही, तोच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे पुन्हा वार्याचा वेग वाढल्यामुळे ४ ते ७ डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्वच भागांना पावसाचा इशारा दिला आहे.
शपथविधीसाठी ३६ तासांचा अवधी उरला असतानाच शिवसेनेत मंत्री पदासाठी लाॅबिंग सुरू
शपथविधीसाठी ३६ तासांचा अवधी उरला असताना शिवसेनेत मंत्री पदासाठी लाॅबिंग सुरू आहे. शिवसेनेच्या निवडक ज्येष्ठ मंत्र्यांना मुंबईत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवसेनेतून ७ आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागणार आहे.
पुणे शहरातील सर्व महायुतीचे आमदार मुंबईत दाखल
मुंबई : पुणे शहरातील सर्व महायुतीचे आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. पुणे शहरातून चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा उच्च व तंत्रज्ञान मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. २ दिवसांपूर्वी सागर बंगल्यावर त्यांनी फडणवीसांची भेट घेतली होती.
गडचिरोली, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के
चंद्रपूर आणि लगतच्या गडचिरोली व यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज बुधवारी सकाळी 7.30 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत. या धक्क्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू तेलंगणातील मुलुगू या गावात होता.
राहुल-प्रियंका गांधी आज हिंसाचारग्रस्त संभलला देणार भेट
दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्गावरील गाझीपूर सीमेवर संथ वाहतूक सुरु आहे. कारण, काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आज हिंसाचारग्रस्त संभलला भेट देणार असल्याने सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची सुमार कामगिरी, काँग्रेसच्या महिला खासदारांनी घेतली राहुल गांधी, प्रियंका गांधींची भेट
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सुमार कामगिरीबाबत राज्यातील महिला खासदारांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली. महाविकास आघाडीतील मित्रपक्षांकडून अडचणीत आणण्याचा प्रकार आणि काँग्रेस संघटनेतील गोंधळ यामुळे अपयश आल्याची माहिती त्यांना दिली. महाराष्ट्रातील खासदार वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, शोभा बच्छाव, प्रतिभा धानोरकर या महिला खासदार भेटीवेळी उपस्थित होत्या.