उत्तरेकडून वाहत येत असणाऱ्या वाऱ्याचा प्रवाह वाढल्यामुळं राज्यात कडाक्याची थंडी जाणवत आहे. नाशिकसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत तापमानाचा पारा हा 11 अंशापर्यंत खाली आलाय. काल (दि. 29 नोव्हेंबर) दिवसभर थंड वारे वाहिल्याने नागरिकांना हुडहुडी भरली. तर शनिवारीही थंडीच्या लाटेची (Cold Wave ) शक्यता हवामान विभाग (IMD) आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या (Mahatma Phule Agricultural University) विभागीय कृषी संशोधन केंद्राने व्यक्त केली. संशोधन केंद्राने नाशिकला यलो अलर्ट दिला आहे
उत्तर भारताकडून ताशी 15 ते 20 किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्याने थंडीचा कडाका वाढलाय. गेल्या 24 तासांत नाशिकमध्ये 2 अंशांनी तर निफाडमध्ये 3 अंशांनी पारा घसरला. त्यामुळे नाशिककर चांगलेच गारठले असून नागरिकांना शेकोट्यांचा आधार घ्यावा लागत आहे. नाशिक जिल्ह्यातील जेऊर येथे नीचाकी तापमान 6 अंश तर अहिल्यानगर येथे 8.5 अंश किमान तापमानाची नोंद झाली. त्यानंतर आता महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विभागीय कृषी संशोधन केंद्राने नाशिकला यलो अलर्ट दिला आहे.
नवं सरकार महाराष्ट्राला पाणीदार करणार, फडणवीसांचं प्रतिपादन
येत्या २४ तासांत उत्तर महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला. पुढील चार ते पाच दिवस वातावरणातील गारठा कायम राहणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं. पुढील काही दिवस वातावरण ढगाळ राहील. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात थंडी वाढत असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस राज्यात थंडीची लाट दिसून येण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्राबरोबरच मराठवाड्यातील काही भागात देखील थंडीची लाट असल्याचं दिसन येत आहे. हिंगोली जिल्ह्यातही थंडीची लाट पसरली असून तापमानात लक्षणीय घट झाली आहे. याचा सर्वाधिक फटका शाळेत जाणाऱ्या मुलांना बसत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमान सरासरीपेक्षा खाली येतांना दिसत आहे.