राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची पुरती दाणादाण उडाली. ठाकरे गटाला फक्त 20 जागा मिळाल्या तर काँग्रेसलाही फक्त 16 आमदार निवडून आणता आले. शरद पवार गटाचा स्ट्राईक रेट कमालीचा घसरला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 10 जागा मिळाल्या. या पराभवानंतर आता महाविकास आघाडीलाच हादरे बसू लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पक्षाच्या नेत्यांनी मविआतून बाहेर पडून स्वबळावर निवडणुका लढण्याचा सूर आळवला. त्यानंतर आता विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनीही काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे.
जम्मू काश्मीर, हरियाणा आणि महाराष्ट्रात कांग्रेस निवडणूक जिंकू शकत होती. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेत्यांच्या मनात अतिआत्मविश्वास निर्माण झाला होता, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता काँग्रेसनेही सावध भूमिका घेतली आहे. यावर आज सविस्तर प्रतिक्रिया देऊ असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते.
विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांची वक्तव्ये समोर येऊ लागली आहेत. काँग्रेसने तर पराभवाचं सगळं खापर ईव्हीएमवर फोडलं आहे. नाना पटोले यांनी काल पत्रकार परिषद घेत मतदानाच्या शेवटच्या टप्प्यातील आकडेवारीवर थेट संशय व्यक्त केला होता. यानंतर निवडणूक आयोगानेही तत्काळ उत्तर दिलं होतं. त्यानंतर आता काँग्रेसने ईव्हीएम विरोधात देशव्यापी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.
फडणवीस अन् अजितदादा हसले, शिंदेंचा चेहरा मात्र पडला.. महायुतीच्या बैठकीत CM ठरला?
तर दुसरीकडे ठाकरे गटातील नेतेही थेट काँग्रेसवर नाराजी व्यक्त करू लागले आहेत. अंबादास दानवे पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत सगळ्यांचा एकमेकांना फायदा झाला. कुणाचाही तोटा झालेला नाही. काँग्रेसचा एक खासदार होता तिथे 13 खासदार निवडून आले. आमचे चार होते तिथे 9 जिंकले. अशी परिस्थिती होती. यानंतर जम्मू काश्मीर, हरियाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस जिंकू शकत होती.
अशी स्थिती निश्चितच होती. पण लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या मनात अतिआत्मविश्वास निर्माण झाला अशी खोचक टीका दानवेंनी केली. हे पक्षाचं नाही तर माझं वैयक्तिक मत आहे हे सांगायलाही दानवे विसरले नाहीत. जागावाटपाच्या चर्चा सुरू असताना आपल्याला कोणतं खातं मिळेल, कोणतं मंत्रिपद मिळेल याचीच चर्चा काँग्रेसचे नेते करत होते आणि हे खरं आहे. सर्वेच्या नावाखाली ज्या जागा त्यांनी घेतल्या तिथे त्यांच्या उमेदवारांना साधे डिपॉझिटही वाचवता आले नाही असा टोला दानवेंनी लगावला.