राज्यात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलंय. निकालाआधीच मुख्यमंत्रिपदावरून देखील महाविकास आघाडीत चांगलंच वादळ उठलं होतं. परंतु तिन्ही पक्षांना मिळून अवघा 50 जागांचा आकडा देखील पार करता आला नाही. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कार्यकर्त्यांनी पुढील निवडणुका महाविकास आघाडीतून नाही तर स्वबळावर लढवाव्या, असा सूर काढल्याचं समोर आलं होतं. उद्धव ठाकरे यांच्याकडे पराभूत झालेल्यांपैकी अनेकांनी (Shiv Sena Leaders) तशी इच्छा व्यक्त केल्याचं देखील विधान परिषदेतील उपनेते अंबादान दानवे म्हटले होते. परंतु यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची उलट प्रतिक्रिया समोर आलेली आहे.
संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीतून (Maharahshtra Politics) बाहेर पडणे ही फक्त काही निवडक कार्यकर्त्यांची भावना आहे. परंतु यासंदर्भात पक्षाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीतून वेगळा होणार नसल्याचं देखील राऊत म्हणाले आहेत. तिन्ही पक्षांना निवडणुकीच्या निकालानंतर मोठा धक्का बसलेला आहे. आपापल्या परीने निकालाचं विश्लेषण केलं जातंय, पराभवाची कारणं शोधण्याचं देखील काम सुरू आहे. पराभवानंतर काही कार्यकर्त्यांची भावना होती की, आपण स्वबळावर निवडणुका लढायला हव्यात. आता पुढील काळात मुंबई महानगरपालिका आणि 14 महापालिकांच्या निवडणुका आहेत, त्यांचा देखील निर्णय घ्यावा लागणार असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.
भाजपाचा मोठा निर्णय! विनोद तावडेंना ‘या’ राज्यांची जबाबदारी
यासंदर्भात अधिक बोलताना संजय राऊत म्हणाले लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी अजून पाच वर्षांचा कालावधी आहे. लोकसभा निवडणूक आम्ही महाविकास आघाडीमधून लढलो होतो. त्याचा फायदा देखील झालाय. परंतु विधानसभा निवडणुकीत दुर्दैवाने यश मिळालं नाही. भविष्यासंदर्भात शांतपणे विचार केल्यास तिन्ही पक्ष एकत्र बसूनच निर्णय घेणार आहे. सध्या तरी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा कोणताही विचार नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय.
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर टीका करत म्हटलंय की, मुख्यमंत्रिपदाचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींकडे सोपवला आहे. त्यामुळे त्यांना स्वाभिमान वैगेरे शब्द वापरण्याचा कोणताही अधिकार नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस, शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाचा चांगलाच धुव्वा उडाला. ठाकरे गटाला 95 पैकी 20 जागा, कॉंग्रेसला 16 तर शरद पवार गटाला 10 जागा मिळाल्या आहेत.