राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याचं उत्तर अद्याप मिळालेलं नसलं तरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत आणि भाजपाचाच मुख्यमंत्री होणार या दोन गोष्टी आता स्पष्ट झाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी काल स्वतः पत्रकार परिषदेत याचा खुलासा केला. आमच्यामुळे सरकार स्थापनेत कोणताच अडथळा येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय आम्हाला मान्य राहील असे शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिंदे गटाचे नेते कार्यकर्ते हताश झाले आहेत. शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी राज्यभरातील मंदिरात महाआरती, अनुष्ठाने होत होती. वरिष्ठांच्या भेटी घेतल्या जात होत्या. परंतु, राजकारणातील गणितं आता बदलली आहेत. याच घडामोडी घडत असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचं एक ट्विट चांगलंच व्हायरल होत आहे.
खासदार शिंदे यांनी आपल्या वडिलांसाठी सोशल मीडियावर एक भावूक करणारी पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी मला बाबांचा खूप अभिमान वाटतो असे म्हटले आहे. त्यांची ही भावूक करणारी पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे. सध्याच्या राजकारणाला जोडून त्यांच्या या पोस्टकडे पाहिले जात आहे. सोशल मीडियावरील या पोस्टची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पोस्टमध्ये श्रीकांत शिंदे म्हणतात, ‘मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्यनेते एकनाथजी शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो.
कोण होणार CM? अमित शहा-तावडेंची खलबतं; आज दिल्लीत बैठक
‘कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांची नम्रता आणि कर्तव्यभावना दिसून येते. आज त्यांनी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर विश्वास ठेवून, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचे पालन करत एक प्रगल्भ उदाहरण ठेवले आहे. सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवते. भल्याभल्यांना मोहात पाडते, पण शिंदे साहेब अपवाद ठरले. त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्रनिर्मिती हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. गोरगरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे. खूप अभिमान वाटतो बाबा!’
Shrikant Shinde पीएम मोदींनी निर्णय घ्यावा : एकनाथ शिंदे
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले, की मी कोणतीही गोष्ट ताणून धरलेली नसून राज्यात सत्तास्थापनेसाठी आमची कोणतीही अडचण नसणार, त्यामुळे मोदींनी अंतिम निर्णय घ्यावा. राज्यात माझी लाडका भाऊ अशी माझी ओळख आहे, मी पंतप्रधान मोदींना काल फोन केला, त्यांना सांगितलं की सरकार बनवताना माझ्यामुळे काही अडचण आहे, असं वाटत असेल तर तुम्ही असं मनात आणू नका, तुम्ही निर्णय घ्या. एनडीएचे प्रमुख नेते म्हणून तुम्ही निर्णय घ्या. आम्हाला तो निर्णय मान्य असेल. सत्तास्थापनेसाठी एकनाथ शिंदेंची कोणतीही अडचण नाही.