राज्यात नुकताच विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2024) निकाल जाहीर झालाय. या निवडणुकीत महायुतीचा दणक्यात विजय तर महाविकास आघाडीचा पराभव झालाय. वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेवा (MNS) म्हणजेच मनसे या दोन्ही पक्षांना एकही जागा मिळालेली नाही. तसेच अपेक्षित मतं देखील मिळाली नाहीत, त्यामुळे आता मनसे पक्षाची मान्यता (Raj Thackeray News) रद्द होईल, अशी चर्चा सध्या सुरू आहे.
मनसेच्या मदतीशिवाय राज्यात सरकार स्थापन करता येणार नाही, असा विश्वास मनसेला होता. परंतु या निवडणुकीत राज ठाकरेंना मात्र मोठा धक्का बसलेला आहे. मागील दोन निवडणुकांमध्ये मनसेचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून आला होता. मात्र यंदा मनसेला खातं देखील उघडता आलं नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची मान्यता रद्द होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
कोणत्याही राजकीय पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता मिळवण्यासाठी काही निकष आहेत. त्यांना एकूण मतदानापैकी 8 टक्के मतं आणि 1 जागा, किंवा 2 जागा किंवा 6 टक्के मतं, किंवा 3 टक्के मतं आणि 3 जागा असे निकष आहेत. या निकषांची पूर्तता मनसेकडून या निवडणुकीत झालेली नाही. त्यामुळे कदाचित मनसेची मान्यता रद्द करण्यात येवू शकते. निवडणूक आयोग लवकरच पक्षाला अशा प्रकारची नोटीस पाठवू शकतो, अशी शक्यता वर्तवली जातेय.
राज्यात 26 नोव्हेंबरनंतर राष्ट्रपती राजवट? चर्चांना उधाण, जाणून घ्या इतिहास
राज्यातील एकूण मतदारांची संख्या 9 कोटी 70 लाख आहे. यावेळी 6 कोटी मतदारांनी मतदान केलंय. त्यामुळे मनसेला 8 टक्के म्हणजे सरासरी 48 मतं मिळणं आवश्यक होतं. परंतु मनसेला अपेक्षित मतं मिळालेली नाही. त्यामुळे पक्षाची मान्यता रद्द झाल्यास त्यांच्याकडून रेल्वे इंजिन हे चिन्ह देखील काढून घेतलं जावू शकतं, अशी शक्यता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलीय. मात्र पक्षाने अशा प्रकारची कोणतीही सूचना अजून आली नसल्याचं स्पष्ट केलंय.
मनसेची मान्यता रद्द होणार का, यावर बोलताना विधिमंडळ माजी प्रिन्सिपल सिक्रेटरी अनंत कळसे म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार मनसेला मतं मिळाली का, हे पाहून आयोग त्यांना नोटीस पाठवेन. उत्तराच्या आधारे, त्यांचा दावा तपासून निवडणूक आयोग त्यांची मान्यता काढू शकते. मनसेला मिळालेली मतं ही निवडणूक आयोगाच्या निकषात बसत नसल्याचं कळसे म्हणाले आहेत. मनसेकडे इतर काहीही पर्याय नसल्याचं त्यांनी म्हटलंय.