पुढील तीन दिवस तमिळनाडू (Tamil Nadu) आणि पुद्दुचेरी (Puducherry) येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच 26 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत दक्षिण कोस्टल आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) वेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता देखील हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. या बरोबर या भागात येत्या काही दिवसांत 75 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
दक्षिण बंगालच्या उपसागराच्या मध्यभागी आणि पूर्व विषुववृत्तीय हिंदी महासागरावर दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून पुढील 24 तासांत ते उत्तर-पश्चिम दिशेकडे सरकण्याची शक्यता असल्याने या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम बंगालचा उपसागर, दक्षिण-पूर्व बंगालचा उपसागर आणि श्रीच्या किनारपट्टीवर 25 नोव्हेंबर रोजी वाऱ्याचा वेग ताशी 40-50 किमी वरून 60 किमी प्रतितास होण्याची शक्यता आहे. तर तामिळनाडू-पुद्दुचेरी किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग 35-45 किमी प्रतितास वेगाने 55 किमी प्रतितास पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तसेच 27 ते 29 नोव्हेंबर दरम्यान याच प्रदेशात 55-65 किमी प्रतितास ते 75 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. त्यामुळे हवामान खात्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.
जबरदस्त! ऑस्ट्रेलियाला धक्का देत भारताचा पर्थमध्ये ऐतिहासिक विजय
हवामान खात्याने सांगितले की, 25 नोव्हेंबर 2024 रोजी समुद्रात उपस्थित असलेल्या मच्छिमारांना पुन्हा किनाऱ्यावर परतण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच मच्छिमारांना 25 नोव्हेंबर 2024 रोजी दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात आणि पूर्व विषुववृत्तीय हिंदी महासागरात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. 29 नोव्हेंबर 2024 पर्यंत नैऋत्य बंगालचा उपसागर आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीला भेट देऊ नका. याशिवाय, मच्छिमारांना 26-29 नोव्हेंबर 2024 दरम्यान पश्चिम-मध्य बंगालचा उपसागर आणि तामिळनाडू-पुडुचेरी किनाऱ्यावर आणि 26-29 नोव्हेंबर 2024 दरम्यान दक्षिण आंध्र प्रदेश किनाऱ्यावर जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे.
मुसळधार पावसाचा परिणाम तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर दिसून येईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. रस्ते आणि सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी दृश्यमानता कमी होऊ शकते. मोठ्या शहरांमध्ये रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत होऊ शकते. काही भागात पाणी साचल्याने बागायती आणि उभी पिके खराब होऊ शकतात. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.