महायुतीने राज्यात मोठे यश महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Election Result 2024) संपादन केले तर मोठा फटका महाविकास आघाडीला बसला. एकही जागा मनसे, वंचित बहुजन आघाडीला मिळता आली नाही. भाजपचाच करिष्मा मुंबईतील निवडणुकीत तर सगळीकडे दिसून आला. मुंबई शहर आणि उपनगरातील 36 विधानसभा मतदारसंघांत अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या मात्र महायुतीला 22 तर महाविकास आघाडीला 14 तर समाजवादी पार्टीला एका ठिकाणी विजय संपादन करण्यास यश आलं आहे.
Election Result 2024 भाजपा मुंबईत किंग
मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांपैकी 16 जागा जिंकत भाजपाने आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीला भाजपकडून आता तगडे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत महायुतीला धोबीपछाड दिला होता. त्याची सगळी कसर विधानसभा निवडणुकीत महायुतीने भरून काढली. भाजपाने 16 जागांवरील विजयी रथ कायम ठेवला. गद्दारी आणि भ्रष्टाचाराचे आरोप खोडून काढले.
लाडकी बहीण योजना, युवा रोजगार प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनाच्या जोरावर महायुतीने जोरदार कमबॅक केलं. 19 जागा भाजपाने लढविल्या होत्या तीन जागा त्यातील त्यांच्या हातातून निसटल्या. भारती लवेकर यांच्यावर वर्सोवा मतदारसंघात मतदारसंघात नाराजी, मालाड मतदारसंघात विनोद शेलार यांना बाहेरचा उमेदवार म्हणून लक्ष्य केलं गेलं. कलीना मतदारसंघात अमरजीत सिंग नवीन चेहरा असल्याने भाजपाला फटका बसल्याचे बोलले जात आहे .
Election Result 2024 नवाब मलिक पराभूत, सना मलिक विजयी
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे गेले. मुंबईतील तीन विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांनी उमेदवार दिले होते त्यातील अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विजय मिळवता आला आहे. अणुशक्ती नगरमधून शरद पवार गटाच्या फहाद अहमद यांचा सना मलिक यांनी पराभव केला आहे. बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दिकी काँग्रेसची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीला सामोरे गेले मात्र त्यांना ठाकरे गटाचे उमेदवार वरूण सरदेसाई यांनी मात दिली आहे तर शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पार्टीच्या अबू आझमी यांनी नवाब मलिक यांचा दारुण पराभव केला.
महाराष्ट्राची कमान कोण सांभाळणार? मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण पुढं?
Election Result 2024 मुंबईत ठाकरे सेना शिंदे सेनेवर वरचढ
पक्षफुटीनंतर पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत जोरदार प्रदर्शन ठाकरे सेनेने केलं होतं आता देखील विधानसभा निवडणुकीत ठाकरे सेनेने दहा जागी आपली विजयी पताका फडकावली आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीत सर्वात जास्त जागा ठाकरे सेनेने मुंबई लढवल्या होत्या. मात्र त्यातील दहा जागांवर त्यांना विजय संपादन करता आला. शिंदे शिवसेनेच्या सहा शिलेदारांना विजयश्री खेचून आणण्यात यश आलं. वरळी विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं ठाकरे सेनेचे आदित्य ठाकरे शिंदे शिवसेनेचे मिलिंद देवरा तर मनसेचे संदीप देशपांडे यांच्यात लढत होती मात्र या ठिकाणी दुसऱ्यांदा विजय संपादन करून आदित्य ठाकरे यांनी आपला गड राखला आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या विद्यमान आमदार यामिनी जाधव यांचा मुंबईतील भायखळा विधानसभेत पराभव झाला असून शिवसेना ठाकरे गटाचे मनोज जामसूतकर या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या वेळी रवींद्र वायकर यांचा निसटता विजय झाला होता मात्र आता विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या मतदारसंघात ठाकरे गटाचे अनंत (बाळा) नर यांनी त्यांचा पराभव केला आहे.
Election Result 2024 मुंबईत काँग्रेसला तीन जागा
मुंबईत काँग्रेस पक्षाला तीनच जागा मिळाल्या आहे. मालाड विधानसभा मतदारसंघात अस्लम शेख यांनी भाजपाचे उमेदवार विनोद शेलार यांचा पराभव केला आहे. धारावी विधानसभा मतदारसंघातून खासदार वर्ष गायकवाड यांच्या भगिनी ज्योती गायकवाड यांनी विजय संपादन केला आहे तर मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात शिंदे सेनेच्या शायना एनसी यांचा पराभव करून अमीन पटेल यांनी पुन्हा एकदा विजय संपादन करून आपला गड राखला आहे.