भाजपाचे नेते काहीही करू शकतात ते अदानींना पण मुख्यमंत्री करु शकतील, या खासदार संजय राऊतांच्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, संजय राऊत हायकमांड आहेत, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही. तसेच यावेळी त्यांनी महायुतीवर सडकून टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे. महायुतीत काहीतरी गडबड सुरू आहे ते काहीही पाप करू शकतात, असे पटोले (Nana Patole) म्हणाले आहेत.
तसेच भाजपाचा काही अपक्षाना पाठिंबा आहे. तसेच ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांना विरोध करत आहेत, ते आमदार देखील आमच्या संपर्कात असल्याचे पटोले म्हणाले आहेत. आमचा एकही आमदार कुठे जाणार नाही, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. आमचा एक्झिट पोलवर थोडाही विश्वास नसल्याचे ते म्हणाले आहेत. मागच्या वेळेस एक्झिट पोलचे सर्व तर्क हे चुकीचे ठरले आहेत. तसेच महायुती सरकार ऐन वेळेला काहीही करू शकतात त्यामुळे आम्ही सतर्क राहू असे ते म्हणाले आहेत.
‘..तर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय महाराष्ट्रातच होईल’; संजय राऊतांचा थेट इशारा
निवडणूक आयोगाने आता नव्याने आलेल्या मतदानाच्या आकडेवारीची माहिती दिली आहे. त्यावर नाना पटोले म्हणाले, निवडणूक आयोगाची यंत्रणा चुकीची आहे. लोकसभेत असा प्रकार झाला होता. निवडणूक आयोगाकडे तक्रारी केली, तर ते बोलतात आम्ही बरोबर आहोत. आम्ही सर्व उमेदवारांना 17 सी फॉर्म बंधनकारक केला आहे. कारण त्यावेळेस कुठलीही तफावत आली तर लगेच तिथेच सापडेल, असेही पटोले म्हणाले आहेत. तसेच पोलिसांना आम्ही स्ट्राँग रुममध्ये येणाऱ्या गाड्यांची तपासणी करायला सांगितली आहे. कारण महायुतीमध्ये गडबड सुरु आहे. ते काहीही पाप करु शकतात. म्हणून स्ट्राँग रुमबाहेर संपूर्ण रात्र ते उद्या सकाळपर्यंत लक्ष ठेवणार आहोत. काही ठिकाणी अधिकारी सुद्धा गडबड करु शकतात ही आम्हाला भिती आहे, असे पटोले म्हणाले.