महाराष्ट्र विधानसभेसाठी बुधवारी, 20 नोव्हेंबरला मतदान झाले. आता उद्या, शनिवारी मतमोजणी होणार आहे. भाजपाप्रणित महायुती आणि काँग्रेसप्रणित महाविकास आघाडी या दोघांनीही बहुमताचा दावा केला आहे. अशा परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय असेल, याबाबत आघाडीचे प्रमुख Adv. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांनी ट्वीट केले आहे.
राज्यात मतदान झाल्यानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल जाहीर झाले. बहुतांश एक्झिट पोलमध्ये राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येण्याचा अंदाज वर्तविला आहे. पोल डायरी, चाणक्य, मॅट्रिझ, पीपल्स पल्स यांच्या अंदाजानुसार मतदारांनी स्पष्टपणे महायुतीला कौल दिला आहे. तर, टीव्ही 9 च्या सर्वेक्षणात महायुतीला 129 ते 139 जागा आणि महाआघाडीला 136 ते 145 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच, पी मार्कमध्ये महायुतीला 137 ते 157 आणि मविआला 126 ते 146 आणि इतरांना 2 ते 8 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. केवळ इलेक्टोरोल एजचे आकडे मविआसाठी समाधानकारक असून या सर्वेक्षणात महायुतीला 121, मविआला 150 आणि इतरांना 20 जागा मिळतील असा अंदाज आहे.
राज्यात पुन्हा महायुती सरकार, टुडेज चाणक्य अन् ॲक्सिस माय इंडियाचा अंदाज काय?
तथापि, बहुतांश मतदारसंघांमधील बंडखोरी तसेच तिरंगी लढती लक्षात घेता, बहुमतासाठी महायुती किंवा महाविकास आघाडीची ओढाताण होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. अशा स्थितीत छोट्या पक्षांसह अपक्षांची भूमिका निर्णायक ठरले. लहान पक्ष आणि अपक्षांचे सरकार बनेल आणि आम्ही दुसर्यांचा पाठिंबा घेत अपक्षांचा मुख्यमंत्री बसवू, असा दावा प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी केला आहे.
त्यापाठोपाठ आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सत्तेत सहभागी होण्याची स्पष्ट भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला किंवा युतीला पाठिंबा देण्याएवढे संख्याबळ मिळाले, तर आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्यांसोबत राहणे पसंत करू, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.