निवडणुकीच्या धामधुमीत पुन्हा एक मोठी बातमी समोर आलीय. सीएनजीच्या (CNG) दरात पुन्हा वाढ झालेली आहे. पेट्रोल अन् डिझेलचे दर वाढल्यामुळे लोकं सीएनजीकडे वळले आहेत. तर तिथे देखील आता महागाईच्या झळा बसत आहेत. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांनी वाढ करण्याची घोषणा (CNG Price Hike) केली. नवीन दर 22 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. त्यानंतर मुंबई आणि संबंधित परिसरामध्ये सीएनजीचा दर 77 रुपये प्रति किलो झालाय. या वाढीमुळे आता सीएनजीवर धावणाऱ्या वाहनांच्या खर्चात देखील वाढ झालीय.
सध्या सर्वसामान्यांची अवस्था दुष्काळात तेरावा महिना अशी झालीय. सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ झाल्याचा परिणाम महानगर गॅस लिमिटेडच्या शेअर्सवर झाल्याचं दिसत आहेत. या कंपनीच्या (Mahanagar Gas Limited) शेअर्समध्ये सुमारे तीन टक्क्यांची वाढ झालेली आहे. कंपनीचा शेअर सध्या 1,160 रूपयांवर व्यवहार करतोय. सरकारने घरगुती गॅस वाटप कमी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर कंपनीने सीएनजीच्या दरात आणखी वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलंय.
एमआयडीसीतील कंपनीत वायू गळती, दोघांचा मृत्यू; 10 जण गंभीर
सरकारने शहर गॅस वितरण कंपन्यांसाठी प्रशासकीय किंमत यंत्रणा गॅस वाटप 20 टक्क्यांनी कमी केलीय. सलग दुसऱ्या महिन्यामध्ये ही कपात करण्यात आलीय. या निर्णयामुळे आता एमजीएल अन् आयजीएल या कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होणार असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. सध्या सीएनजीच्या किमतीमध्ये दोन रुपयांची वाढ सुमारे 2.6 टक्के आहे. एपीएम गॅस वाटपातील कमतरता भरून काढण्यासाठी सीएनजीच्या किमती 8 ते 10 टक्क्यांनी वाढवाव्या लागतील, असं मत तज्ञांनी व्यक्त केलंय.
इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड देखील सीएनजीच्या किमती वाढवण्याची शक्यता आहे. दरवाढीमुळे आता सीएनजी वाहन चालकांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संचालन खर्चात वाढ झालीय, त्यामुळे आता भाडे देखील वाढण्याची शक्यता आहे. वाढत्या महागाईने आधीच सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय. अशातच आता सीएनजीच्या दरात वाढ झालीय, त्यामुळे पुन्हा एक नवीन आव्हान समोर उभं ठाकलं आहे.