अमेरिकेत (US) मोठ्या प्रमाणात लाचखोरी आणि फसवणूक केल्याचा आरोप भारतातील अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी (Gautam Adani) आणि इतर सात जणांवर आहे. हे वृत्त रॉयटर्स आणि ब्लूमबर्ग यांनी 21 नोव्हेंबर रोजी दिले होते. या अहवालानुसार अदानी समूहाने (Adani Group) सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिली. गौतम अदाणी आणि त्यांचा पुतण्या सागर अदाणी यांनी कंत्राट मिळविण्यासाठी 2,000 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप करण्यात आला. हा प्रकार उजेडात येताच भारतीय राजकारणात खळबळ उडाली आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदी आणि भाजपवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. पंतप्रधान मोदी पाठीशी असल्यानेच गौतम अदानींना अटक होत नाही, असा आरोप राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत केला होता. दुसरीकडे या प्रकाराने शेअर बाजारात हाहाकार उडाला आहे. शेअर बाजाराचे निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण झाली आहे. अदाणी समुहाच्या शेअर्समध्ये जवळपास वीस टक्क्यांनी घसरण झाली आहे. तसेच अदाणी समुहाचे बाजारमूल्य दोन लाख कोटींनी घटले आहे.
अदानींना आजच अटक करा; अमेरिकेत हालचाली वाढताच राहुल गांधी आक्रमक
अदानी एन्टरप्रायजेसच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण दिसून आली. अदाणी एनर्जी सोल्यूशनही लाल रंगात होते. अदानी ग्रीन एनर्जी या कंपनीला कंत्राट मिळवण्याबद्दल लाच दिल्याचा आरोप ठेवला गेला आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअर्समध्ये 19.17 टक्क्यांची घसरण झाली. अदाणी टोटल गॅस 18.14 टक्के, अदाणी पॉवर 17.79 टक्के आणि अदानी पोर्टसच्या शेअर्समध्ये 15 टक्क्यांची घसरण झाल्याचे दिसून आले.
Gautam Adani नेमका प्रकार काय ?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने गौतम अदानी यांच्यावर अमेरिकन गुंतवणूकदारांची फसवणूक आणि अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप केला आहे. त्याच्यासोबत त्याचा पुतण्या सागर अदानी, अदानी ग्रीन एनर्जीचे अधिकारी आणि अझुरे पॉवर ग्लोबल लिमिटेड सिरिल कॅबनेस यांनाही आरोपी करण्यात आले आहे. त्याच्यावर सिक्युरिटीज आणि वायर फसवणूक करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.