विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Elections) आज मतदान होत आहे. दरम्यान काल विरारमध्ये मोठा राडा झाला. भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलाय. त्याचप्रमाणे विनोद तावडे आणि राजन नाईक यांच्यावर देखील निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूरांनी केलीय. विरारच्या या प्रकरणामुळे राजकीय वातावरण देखील खूप तापलेलं आहे. या सगळ्यात एका मराठी लेखकाची सूचक पोस्ट चांगलीच व्हायरल होतेय.
सोशल मीडियावरुन अरविंद जगताप (Arvind Jagtap) यांनी विनोद तावडे यांच्या राड्यानंतर एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केलीय.अरविंद जगताप यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आलीय. अरविंद जगताप यांनी अध्यात्मिक, देवाला प्रसाद चालतो, विनोद नाही… अशी पोस्ट केलीय. यावर अनेकजणांनी कमेंट्स केल्याचं समोर आलंय. पण या पोस्टमध्ये अरविंद जगताप यांनी अध्यात्मिक असा शब्द देखील वापरला आहे.
निवडणुकीत बिटकॉईनचा गैरवापर केल्याचा आरोप; सुप्रिया सुळेंचा संताप
दरम्यान या प्रकरणावर अभिनेता हेमंत ढोमे यांनी देखील सूचक पोस्ट केली होती. हेमंतने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, निवडणूक, लोकशाही हे सारं म्हणजे… ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’ तून महाराष्ट्राला सोडवा! तसेच त्याने #कोणाचागेमकोणाला_फेम असं हॅशटॅग देखील वापरलं आहे.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर नालासोपारा मतदारसंघामध्ये पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात येतोय. विरार पूर्वच्या विवांता हॉटेलमध्ये विनोद तावडे कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत होते, त्यावेळी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये गेले. त्यावेळी विनोद तावडे आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.
दरम्यानच्या काळात पोलिसांनी मध्यस्थी करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. पण विनोद तावडे होते त्याच्या शेजारील टेबलवर बविआ कार्यकर्त्यांच्या हातात काळ्या रंगाची बॅग लागली. त्या पाकिटातून नोटांची बंडलं बाहेर आली होती. त्यानंतर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी गोंधळ घालायला सुरूवात केली. या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना प्रश्न विचारत थेट 4 तास हॉटेलमध्ये रोखून धरलं होतं. त्यानंतर हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांच्या गाडीमधून विनोद तावडे हॉटेलबाहेर निघाले होते.