एकिकडे राजकारणामुळं महाराष्ट्रातील वातावरण (Maharashtra Weather) तापलेलं असतानाच दुसरीकडे शीतलहरींमुळं मात्र उत्तरेतील राज्यात थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये थंडीनं चांगलाच जोर धरला असून, निफाडमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली. तापमानाचा आकडा निफाडमध्ये 11 अंशापर्यंत खाली आल्याचं पाहायला मिळालं.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्यातील तापमानाच अशीच घट अपेक्षित असून, बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका वाढताना दिसेल. विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी सकाळच्या वेळी बाहेर पडणाऱ्यांना बोचरी थंडी जाणवणार असून, बहुतांश भागांमध्ये हीच स्थिती असेल. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मात्र फारसा गारठा नसल्यामुळं इथं तापमानातील वाढ अडचणी वाढवताना दिसेल.
निवडणुकीत बिटकॉईनचा गैरवापर केल्याचा आरोप; सुप्रिया सुळेंचा संताप
राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मागील 48 तासांपासून तापमानात घट होण्यास सुरुवात झाल्यामुळं अनेक भागांमध्ये सकाळी गारठा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सूर्य मावळतीला गेल्यानंतरही थंडीचा कडाका वाढू लागल्यामुळं अनेक घरांबाहेर, चौकाचौकात आता शेकोट्या दिसण्यास सुरुवात झाली आहे. पुढील दोन दिवस पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील घाट क्षेत्रामध्ये आकाश निरभ्र आणि सकाळच्या वेळेत काही भागात धुक्याची हजेरी असेल. तर, भारतीय हवामानशास्त्र विभागाने तापमान स्थिर राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.